हैदराबाद, 14 डिसेंबर : तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने 18 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना 8 डिसेंबरला घडली होती. त्याआधी दोन दिवस हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. त्यानंतर झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात असताना हा प्रकार घ़डला होता. त्यावेळी रस्ता विसरल्यानंतर आरोपीच्या भावाने त्या दोन मुलींना पाहिलं. रिक्षाचालक असलेल्या आरोपीच्या भावाने त्या दोन्ही मुलींना घेऊन स्वत:च्या घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवलं. तेव्हा त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील एका लॉजवर नेलं. लहान मुलगी झोपताच मोठ्या बहिणीवर नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्या दोघींना सोडून तो फरार झाला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन केला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार अरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
गेल्या महिन्यात दिशा सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर हैदारबादसह देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यातही घेतलं. तपासासाठी घटनास्थळी आरोपींना नेले असता त्या ठिकाणी झालेल्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले. त्यानंतर या चकमकीवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
आंध्र प्रदेशात शुक्रवारी दिशा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. यामध्ये महिलांबाबत घडलेल्या गुन्ह्यांची प्रकरणे 21 दिवसांत सोडवण्याचा नियम करण्यात आला आहे. तसेच यात दोषी आढळल्यास त्याला फाशी देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या नव्या नियमाचे नाव आंध्र प्रदेश दिशा अधिनियम अपराधिक कायदा अधिनियम, 2019 असं ठेवण्यात आलं आहे.