नागपूर: ‘शिवसेनेने कितीही मागणी केली तरी रामटेक आणि काटोलची जागा भाजपाचीच आहे आणि राहील. दोन्ही विधानसभा मतदारसंघात आमचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीला अर्थ उरत नाही,’ असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सांगितले.
काही दिवसांपासून शिवसेना रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघाची मागणी करत आहे. याबाबत बावनकुळेंना विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेला मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांची मागणी पूर्ण होणार नाही. सद्य:स्थितीत दोन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. भविष्यातही भाजपाच्याच उमेदवाराला दोन्ही जागा मिळतील, असे स्पष्ट केले. यावेळी राज्यभरातील जागा वाटपाच्या समीकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे घेतील. परंतु, विद्यमान जागा भाजपा सोडणार नाही, असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील भाजपाच्या काही आमदारांची कामिगरी सरस नसून त्यांना डावलण्याच्या मुद्यावर सावध पवित्रा घेत कामगिरीचे प्रमाण निश्चित करण्याचा सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना असल्याचे सांगितले.
घोडमारेंना तिकीट मिळणारच नव्हते
भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. घोडमारेंच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे कुठलाही फरक पडणार नाही. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समीर मेघे यांचे कार्य उत्कृष्ट आहे. त्यामुळे घोडमारेंना पक्षाचे तिकीट मिळणारच नव्हते, असे बावनकुळे म्हणाले. तर गेल्या पाच वर्षांपासून घोडमारे पक्षात नव्हतेच, असे सांगून आमदार सुधाकर देशमुख यांनी घोडमारेंच्या एक्झिटला फारसे महत्त्व नसल्याचा टोला लगावला.
जयंत पाटील अखेरच्या घटका मोजताहेत
राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा आणि शिवसेनेचे काही आमदार आणि नेते संपर्कात असल्याचे वक्तव्य अखेरच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीप्रमाणे आहे. अंतिम घटका समीप आलेल्या व्यक्तीला जीवंत राहण्याची टिमटिमती अपेक्षा असते. तसेच काहीसे त्यांचे झाले आहे, असे बावनकुळे म्हणाले.