नागपूर : आरक्षण देण्याच्या नावाखाली राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना त्यांनी आरक्षणाची घोषणा करून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे, अशी टीक करतानाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिल्यास महाराष्ट्रात आरक्षण देण्याची गरजच पडणार नाही, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता राज ठाकरे यांनी हे मत मांडले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबाही दिला. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करणारे भाजपचे नेते कुठे आहेत? असा सवाल करतानाच जी गोष्ट आपल्या हाती नाही, त्याची राज्यसरकार घोषणा कशी करू शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मग विचारवंत, साहित्यिक म्हणून का मिरवताय ?
देशातील परिस्थितीवर प्रत्येकानं बोललं पाहिजे. साहित्यिक आणि विचारवंतांनीही बोललं पाहिजे, असं सांगतानाच देशातील परिस्थितीवर बोलत नसाल तर साहित्यिक आणि विचारवंत म्हणून कशाला मिरवताय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. भाजपचं सरकार म्हणून नव्हे तर उद्या काँग्रेसचं किंवा माझंही सरकार आलं तरी त्यावर विचारवंत आणि साहित्यिकांनी बोललंच पाहिजे, असंही ते म्हणाले.
दुष्काळासाठी काय कामं केली ?
दुष्काळावरूनही राज यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला, २९ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून का जाहीर करण्यात आली, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी केली.
हल्ल्या आधीचं ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता असं मोदींनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जाते आहे, असा चिमटाही राज यांनी काढला.
राज काय म्हणाले
> परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या नेते आणि अधिकाऱ्यांना पकडून काय अभ्यास केला हे एकदा विचाराच
> टँकरची लॉबी कोणाची आहे? कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे तपासा; आम्हीही तपासतोय
> धंदा चालवण्यासाठीच राजकारण्यांकडून टँकर लॉबीला मोकळं रान करून दिलं जातंय
> पंतप्रधान सुशिक्षित आहे का हा विषय नव्हता, तो सुज्ञ असावा ही आमची इच्छा होती
अधिक वाचा : ८५ लाख घेऊन उद्योजक पसार