नवी दिल्ली : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज (सोमवाऱ) ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला आज दिल्लीतून सुरवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावरुन या आंदोलनाला सुरवात केली आहे. त्यांनी कैलास मानस सरोवर यात्रेवरुन आणलेले ‘पवित्र जल’ राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीवर अर्पण करुन या आंदोलनाला सुरवात केली.
दरम्यान, आजच्या या भारत बंदला देशभरातील मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 88.12 रुपये झाला आहे.
इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ‘भारत बंद’च्या माध्यमातून केला जात आहे. देशभर आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : आ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील