नागपूर : लॉकडाऊननंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकत असल्याची प्रसिद्धी केली. त्यामुळे आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. परंतु आरएसी असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.
ज्या प्रवाशांकडे स्वत:चा बर्थ आहे त्यास कन्फर्म तिकीट असे संबोधण्यात येते. आरएसी प्रवाशांना केवळ बसण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे आरएसी प्रवाशांना कन्फर्म मानण्यात येत नाही. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपला पीएनआर क्रमांक आरएसी असतानाही प्रवास रद्द केला. यात त्यांच्या तिकिटाचे पैसेही त्यांना मिळाले नसून प्रवासापासूनही त्यांना वंचित राहण्याची पाळी आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. परंतु आता आरएसी प्रवासीही प्रवास करू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने माहिती न दिल्यामुळे गैरसमज
केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी प्रसिद्धी रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे आरएसी प्रवाशांमध्ये गैरसमज पसरला. त्यामुळे ते प्रवास करू शकले नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती.