पुणे : पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. अपघातात सहा रिक्षा, एक कार व दुचाकींचं नुकसान झालं आहे.
आरटीओकडे जाणाऱ्या मार्गावरील शाहीर अमर शेख चौकात दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे प्रशासनानं हे होर्डिंग उतरवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते. ते कापून काढत असताना हा अपघात झाला. होर्डिंग कोसळलं तेव्हा रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी सुरू होती आणि तेथील सिग्नलवर सहा रिक्षा, दोन दुचाकी व एका कार उभी होती. अचानक आदळलेल्या वजनदार होर्डिंगच्या दणक्यानं यातील काही रिक्षाचा चुराडा झाला. आतील चालक व प्रवाशांना जबर मार लागला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळं या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतूक उपायुक्त आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीची पाहणी केली जात आहे. तुटलेल्या होर्डिंग सांगाडा कटरच्या मदतीनं कापण्यास सुरुवात झाली आहे.
मृतांची नावे :
श्यामराव धोत्रे (४८), भीमराव कासार (७०), शिवाजी देविदास परदेशी (४०)
आठ जण जखमी :
जावेद मिसबाउद्दीन खान (४९), उमेश धर्मराज मोरे (३६), किरण ठोसर (४५), यशवंत खोबरे (४५), महेश वसंतराव विश्वेश्वर (५०), रुक्मिणी परदेशी (५५) हे सर्वजण ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत तर देवांश परदेशी (४) आणि समृद्धी परदेशी (१८) यांनी उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
अधिक वाचा : पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र