नागपूर : आज कचऱ्याची समस्या विकासामध्ये अडथळा निर्माण करीत आहे. मात्र या कचऱ्याचे योग्य संकलन व योग्य विल्हेवाट लावल्यास त्यामधूनही विकास साधता येऊ शकतो. केंद्र सरकारने स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छ भारत मिशन सुरू केले. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी समजणे आवश्यक आहे. कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ओला व सुका कचरा विलगीकरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. घरा घरातील कचरा संकलीत करताना एक दिवस फक्त ओला व एक दिवस फक्त सुका कचरा संकलीत केला जावा. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन २०१९ अंतर्गत शुक्रवारी (ता. २३) लक्ष्मी नगर झोनमधील प्रभाग ३७ येथील अत्रे लेआउट जगदंबा मंदिर परिसरात ‘कचरा विलगीकरण करण्याबाबत जनजागृती‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या.
कार्यक्रमाला लक्ष्मी नगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, लक्ष्मी नगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, विभागीय अधिकारी रामभाऊ तिडके, सेंट्रल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेच्या लीना बुधे, स्वास्थ्य निरीक्षक ऋषिकेश इंगळे, प्रकाश वाकलकर, राजेश भुजाडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनी ओला व सुका कचरा विलगीकरण करणे व स्वच्छतेबाबत शपथ घेतली. पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचेआहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्यात आल्यास त्यावरील प्रक्रियेतील अडथळे दूर करता येऊ शकतात. यासाठी प्रत्येक घरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून एकाच गाडीमध्ये ओला व सुका कचरा संकलीत केला जातो. त्यामुळे तो कचरा पुन्हा मिश्रीत होतोच. यावर उपाय म्हणून एक दिवस फक्त ओला कचरा व एक दिवस फक्त सुका कचरा संकलीत करण्याची संकल्पना यावेळी परिसरातील नागरिकांनी मांडली. यावर महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवित यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना यशस्वी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अधिक वाचा : रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू : नितीन गडकरी