नागपूर : अनावश्यक विद्युत दिवे बंद करून विजेची बचत करा. पोर्णिमेच्या उजेड्या रात्री किमान एक तास दिवे बंद करून एका चांग़ल्या उपक्रमात योगदान द्या, असे आवाहन करीत मनपाचे कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्हेरायटी चौकातील व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली.
नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रा. अनिल सोले यांच्या प्रेरणेने प्रत्येक पोर्णिमेच्या उजेड्या रात्री ‘पोर्णिमा दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येतो. याअंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी स्थानिक व्हेरायटी चौकात पोर्णिमा दिवसानिमित्त जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी जनजागृती केली.
व्हेरायटी चौकातील बाजार परिसरातील प्रत्येक प्रतिष्ठानांमध्ये जाऊन रात्री ८ ते ९ या काळात किमान एक तासासाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी विद्युत दिवे बंद केले आणि वीज बचतीच्या महायज्ञात आपला सहभाग नोंदविला. इतकेच नव्हे तर यापुढे पोर्णिमा दिवस आणि अन्य दिवशीही अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून शक्य तेवढी वीज बचत करण्याचे आश्वासन दिले. मनपाच्या वतीनेही परिसरातील अनावश्यक पथदिवे बंद करण्यात आले होते.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सहायक अभियंता ए. एस. मानकर, उपअभियंता एम.एम. बेग, कनिष्ठ अभियंता जी. एम. तारापुरे, कनिष्ठ अभियंता डी.व्ही. वंजारी, सुनील नवघरे, प्रशांत कालबेंडे सहभागी झाले होते. ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जयस्वाल यांच्यासह मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, कार्तिकी कावळे, बिष्णुदेव यादव, दिगांबर नागपुरे, सारंग मोरे, दादाराव मोहोड यांनी जनजागृती केली. या मोहिमेत स्वयंसेवकांचा उत्साह बघून काही नागरिकही सहभागी झाले होते.
अधिक वाचा : जर्मन शिष्टमंडळाचे महापौरांनी केले स्वागत : दोन दिवसीय कार्यशाळेत घेणार सहभाग