नागपूर : कधी काळी नागपूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेला गोरेवाडा तलाव प्रथमच आटला आहे. १९१२ मध्ये एक लाख नागपूरकरांसाठी हा तलाव तयार करण्यात आला होता. तलाव आटल्याने नागपूर शहरावर मोठे जलसंकटाचे सावट आहे.
तोतलाडोह आणि नवेगाव खैरी येथे पाणी असले तरी ते गोरेवाड्यातील आटलेली पाणीपातळी मोठे संकट निर्माण करीत आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी नागपूरकरांसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. हा तलाव कधीच आटला नव्हता. यंदा मात्र तो आटल्याने वनविभागानेही आश्चर्य व्यक्त केले आहे. गोरेवाड्याचे राउंड ऑफिसर आय. ए. जलित यांनी २०११ नंतर प्रथमच गोरेवाडा तलावाची पातळी एवढ्या खाली गेल्याचे सांगितले. तलाव आटल्याचे प्रथमच बघितल्याचेही ते म्हणाले. फॉरेस्ट रेंज ऑफिसर पांडुरंग पखाले यांनीही तलावाचा भूतल आपण प्रथमच बघत असल्याकडे लक्ष वेधले. वन्यजीव या तलावात पडू नयेत म्हणून तलावात असलेल्या विहिरी झाकून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पाण्याची साठवणूक करण्यासाठी महापालिका गोरेवाडा तलावाचा वापर करते. यंदा कमी पावसामुळे तशीही या तलावाची पातळी वाढली नाही. त्यातच कडक उन्हामुळे तलावातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावच आटला. शिवाय, पेंचपासून गोरेवाडा येथील पम्पिंग स्टेशनवरून पाण्याची उचल होत असल्यानेही तलावाची पातळी आटत गेली. या तलावात कॅनलच्या माध्यमातून पेंच येथून गोरेवाडा तलावात पाणी सोडण्यात येते. आता मनपाने तोतलाडोहहून ४५ कि.मी. लांबीची पाइपलाइन टाकल्याने थेट गोरेवाडा पम्पिंग स्टेशनला पाण्याची उचल होते, याचाही मोठा फटका गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीला झाला आहे.
तलावाबाबत महत्त्वाचे
-१९१२ मध्ये १.०१ लाख नागपूरकरांसाठी या तलावाची प्राथमिक पाण्याचा स्रोत म्हणून उभारणी करण्यात आली.
-या तलावाला सीता गोंडी या नावानेही ओळखले जाते. गोंड राजाच्या काळात सीता गोंडी या आदिवासी महिलेने या तलावाचे बांधकाम केले.
-गोरेवाडा गाव वसल्यानंतर या तलावाला ‘गोरेवाडा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर येथे पाणीपुरवठ्यासाठी वापर होऊ लागला. अंबाझरी तलावाच्या दुप्पट म्हणजे ११ चौरस मैल असे या तलावाचे क्षेत्रफळ आहे.
अधिक वाचा : सौ. माधुरी प्रविण ठाकरे यांनी स्विकारला सभापतींचा पदभार