नवी दिल्ली, 12 मे : येत्या 17 मे रोजी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. अद्यापही देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत काय सांगणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले असताना पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –
1 जगभरात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांनी सुहृह गमावले आहेत. मी त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो. एका विषाणूमुळे जगातल्या कोट्यवधी लोकांचे जीव धोक्यात आहेत. सारं जग जीव वाचवायच्या लढाईत गुंतलं आहे. आपण कुणीच हे असं संकट यापूर्वी पाहिलेलं नाही. ऐकलेलंही नाही. मानवजातीसाठी हे सगळं अकल्पित आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. पण हरणं, थकणं, हार मानणं मानवाला मंजूर नाही.
2. देशातील उद्योगधंदे रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक स्टेक होर्डर्सनी सतर्क राहायला हवे. कोरोना संकटाचा सामना करीत असताना नव्या संकल्पासह मी आज एक विषेश आर्थिक पॅकेजची घोषणा करीत आहे. हा आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य काम करणार आहे. या आर्थिक पॅकेजची किंमत 20 लाख कोटी रुपये इतकी असून ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.
3 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे, जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो.
4 आर्थिक पॅकेजमुळे सर्व क्षेत्रात गुणवत्ता वाढवेल. शेती व उद्योगांना या पॅकेजचा मोठा फायदा होईल.
5 स्वावलंबी भारत उभारण्याची गरज आहे. कोरोना संकटाच्या आधी एकही PPE किट बनत नव्हती. N-95 मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं. आता स्थिती आहे, की भारतात दररोज 2 लाख PPE किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे. संकटाचं रुपांतर संधीत करण्याची भारताची ही दृष्टी आपल्यासाठी प्रभावी ठरणार आहे.
6 आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. जागतिकीकरणात या शब्दाचा अर्थ – अर्थकेंद्रित वैश्विकरणापेक्षा मानवकेंद्रित जागतिकीकरण अभिप्रेत आहे. भारताची संस्कृती, भारताचे संस्कार त्या स्वयंपूर्णतेची व्याख्या करतात, तेव्हा मानवकल्याण हे ध्येय असते. त्यात आत्मकेंद्रीत दृष्टिकोन नसतो. जगाची शांती, मैत्री आणि सहयोग यात समाविष्ट आहे. सारं विश्व आपलं कुटुंब आहे, ही आपली संस्कृती आहे.
7 21 वे शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्नचं नाही तर आपली जबाबदारी आहे. मात्र याचा मार्ग काय असेल. जगाच्या सध्याच्या स्थितीनुसार याचा मार्ग एकच आहे..आत्मनिर्भर भारत…शास्त्रातही आपल्याला हेच सांगितलं आहे.
8 विश्व एक परिवार आहे. भारत जेव्हा आत्मनिर्भरताविषयी म्हणतो तेव्हा आत्मकेंद्री भारत अपेक्षित नाही. आपली संस्कृती संपूर्ण विश्वाला आपला परिवार मानते. ती पृथ्वीला आई मानते. भारत भूमी जेव्हा आत्मनिर्भर होते, तेव्हा सुखी व समृद्ध विश्व तयार होते.
9 भारताच्या प्रगतीमध्ये नेहमी वैश्विक प्रगती समाविष्ट आहे. भारताच्या कृतीचा प्रभाव वैश्विक कल्याणाकडेच असतो. ग्लोबल वॉर्मिंग, तणावमुक्ती यासाठी भारताने जगाला भेट दिली आहे. जगण्या-मरण्याच्या या जागतिक लढाईत आता भारताची औषधं कामास येत आहे. भारताची जगभर प्रशंसा होते, तेव्हा ती अभिमानाची गोष्ट असते.
10 लॉकडाऊन 4 नवीन नियमांचां असेल, राज्यांकडून मिळणाऱ्या सल्ल्यानुसार नियम ठरवले जातील. 18 मेपूर्वी याबाबत माहिती देण्यात येईल, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.