नागपूर : पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय संघाला आज, मंगळवारी वर्ल्डकपआधी सरावाची अंतिम संधी मिळेल. दुसऱ्या आणि अंतिम सराव सामन्यात भारतीय संघाची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा हा पहिलाच सराव सामना असेल. कारण, त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा संघ वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला आहे.
वर्ल्डकपच्या विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. मात्र, आयपीएलनंतर इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय फलंदाजांना वेगवान खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना पहिल्या सामन्यात तरी अडचण आली. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या द ओव्हलच्या खेळपट्टीवर जबरदस्त स्विंगचा मारा करून भारताचा डाव अवघ्या ३९.२ षटकांत गुंडाळला होता. ट्रेंट बोल्टने सुरुवातीपासूनच टप्प्यावर मारा केला होता. त्यामुळे रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, कुलदीप यादव यांना त्याचा प्रभावी मारा काही पेलवला नाही. लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, बोल्टचा एक उसळता चेंडू हलक्या हाताने खेळण्याची चूक त्याला भोवली. हार्दिक पंड्याने थोडी फटकेबाजी केली खरी; पण नीशमचा ‘आउट स्विंग’ला तो चकला.
धोनीने ४२ चेंडू खेळून संयम दाखवला. मात्र, साउदी पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्नही फसला होता. दिनेश कार्तिकलाही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवता आली नाही. या खेळपट्टीवर तग धरू शकला तो एकटा रवींद्र जडेजा. त्याने या सराव सामन्यात अर्धशतक ठोकले होते. ‘इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार रहावे,’ अशी अपेक्षा कर्णधार कोहलीने व्यक्त केली आहे.
गोलंदाजांमध्ये भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, शमी आणि हार्दिक पंड्या यांच्या वाटेला केवळ चार षटके आली. कर्णधार विराट कोहलीने मात्र या सराव सामन्यात फिरकी गोलंदाजांचा अधिक वापर केला. चहलने ६ षटकांत ३७ धावा देत एक विकेट घेतली होती, तर कुलदीप यादवला ८.१ षटकांत एकही विकेट घेता आली नाही. आयपीएलमध्ये कोलकाता संघाकडून खेळताना खराब कामगिरीमुळे त्याला बसविण्यात आले होते. त्याचा आत्मविश्वास पुन्हा वाढावा म्हणून त्याला अधिक षटके देण्यात आल्याची चर्चा होती. रवींद्र जडेजाने मात्र ७ षटकांत केवळ २७ धावा देत एक बळी मिळवला. डावपेचांची प्रभावी अमंलबजावणी करण्यास अपयश आल्याची बाब कोहलीने मान्य केली होती. आता दुसऱ्या सामन्यात त्याचे डावपेच काम करतात, की नाही, याबाबत उत्सुकता असेल.
केदार, विजय शंकरला मिळणार संधी?
विजय शंकरला या अखेरच्या सराव सामन्यात संधी मिळेल, की नाही याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या सराव सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करीत असताना त्याच्या हाताला खलील अहमदचा चेंडू लागला होता. वैद्यकीय अहवालात त्याची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, तरीही त्याला पहिल्या सराव सामन्यात संधी मिळाली नव्हती. दुसरीकडे, आयपीएलदरम्यान अष्टपैलू केदार जाधवचा खांदा दुखावला होता. तो तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यालाही पहिल्या सराव सामन्यात संधी मिळाली नव्हती. या दोघांच्या बाबतीत संघव्यवस्थापनाला कुठलाही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे यांच्या समावेशाबाबत उत्सुकता आहे.
वेळ : दुपारी ३ पासून
स्थळ : सोफिया गार्डन, कार्डिफ
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर
अधिक वाचा : बारावीचा निकाल आज होणार जाहीर