नागपूर : घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनीअटक केली. विक्रमसिंग बनाफर आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. पीडित महिला अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुदामनगरात राहते. १४ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला एक मुलगाही आहे. घरगुती कारणावरून पती पत्नीत वाद झाल्यानंतर पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला. तिचा मुलगा तिच्या पतीजवळच राहतो. ती एका बिल्डरकडे काम करते आणि एकटीच राहते.
आरोपी बनाफरसोबत सहा वर्षांपूर्वी तिची ओळख झाली. त्यावेळी तो पोलीस दलात नव्हता. बेसा बेलतरोडीतील एका मित्राकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे आले असताना त्यांनी येथे मुक्काम केला. महिलेच्या तक्रारीनुसार यावेळी बनाफरने तिला गुंगीचा पदार्थ दिला आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मोबाईलमध्ये त्याने या संबंधाची अश्लील क्लिप बनविली. ती क्लिप दाखवून तो तिच्यासोबत नंतर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करू लागला. तब्बल सहा वर्षांपासून त्यांच्यात शंभरपेक्षा जास्त वेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. तीन वर्षांपूर्वी तो पोलीस मुख्यालयात रुजू झाला. त्यांच्यात अनेकदा लग्न करण्याचाही विचार झाला. मात्र कधी तो तर कधी ती तयार नसल्याने त्यांचे लग्न झाले नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बनाफरचे लग्न झाले. आता त्यापासून आपली सुटका होईल, असे पीडित महिलेला वाटत होते. मात्र तो लग्नानंतर तिच्याकडे वारंवार यायचा आणि जनावरासारखा वागायचा. तिच्यासोबत तो अनैसर्गिक कृत्यही करायचा. २२ सप्टेंबरला त्याने सगळ्या सीमा ओलांडल्या. त्याच्या किळसवाण्या कृत्याला तिने विरोध केला असता त्याने मारहाणही केली आणि धमकीही दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे पीडित महिलेने बुधवारी सायंकाळी बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजया आकोत यांनी तिची फिर्याद ऐकून घेतल्यानंतर आरोपी विक्रमसिंग बनाफर याच्याविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली.
मैत्रिणीकडे घेतला आधार
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी बनाफर तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करताना विकृत कृत्य करायचा.
त्याच्या दहशतीमुळे पीडित महिला तिच्या मैत्रिणीकडे जाऊन लपली होती. मैत्रिणीने आधार दिल्यामुळेच तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.