नागपूर : नागपूर शहर ‘ग्लोबल सिटी’ म्हणून वाटचाल करीत आहे. दुसऱ्या टप्प्यात निवड होऊनही नागपूर शहराने देशात स्मार्ट सिटीमध्ये पहिले स्थान कायम ठेवले आहे. ही क्रमवारी पुढेही कायम राहावी यासाठी प्रत्यक्षातही शहरात स्मार्ट प्रकल्प तयार होणे आवश्यक आहे. यामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी ‘बिल्डींग इफिसिएन्सी ॲक्सेलेटर’ने घेतलेला पुढाकार स्त्युत्य आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना त्यामध्ये लोकसहभाग घेणे आवश्यक आहे. एकूणच शहराचा विकास लोकसहभागाविना शक्य नाही, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट व आयसीएलईआय (साऊथ एशिया) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बिल्डींग इफिसिएन्सी ॲक्सेलेटर’मध्ये नागपूर शहराचा सहभाग या विषयावरील कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शुक्रवारी (ता. ८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यशाळेत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, आयसीएलईआयचे उपमहासचिव तथा आयसीएलईआय दक्षिण आशियाचे कार्यकारी संचालक इमानी कुमार, आयसीएलईआय दक्षिण आशियाच्या उपसंचालक सौम्या चतुर्वेदुला, आर्किटेक्ट अशोक मोखा, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्युटच्या सुमेधा मालविया, आयसीएलईआय दक्षिण आशियाचे व्यवस्थापक निखिल कोळसेपाटील, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, इंडो-स्विस बिल्डींग एनर्जी इफिसिएन्सी प्रोजेक्टच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक सास्वती चेतिया यांच्यासह शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागरिकांच्या सुविधांसाठी शहरात विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र या प्रकल्पांबाबत जनजागृती करून यामध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक आहे. याच संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेयर इनोव्हेशन कौंसिल’मुळे अनेक स्मार्ट संकल्पना पुढे आल्या आहेत. हे केवळ लोकसहभागाच्या संकल्पनेतून साध्य होऊ शकले. प्रत्येक प्रकल्प हा शहराच्या विकासाला गती देणारा आहे. त्यामुळे या गतीमध्ये शहरातील जनतेचा सहभाग घेतल्यास खरा शाश्वत विकास साध्य होऊ शकेल, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
यावेळी बोलताना नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे म्हणाले, इतर देशांच्या तुलनेत भारताला नैसर्गिक संपदेचे वरदान लाभले आहे. मात्र भविष्यात या संपदेचा ऱ्हास होणार आहे. हे निश्चित असताना या संपदेचा उपयोग करून त्यातून आपल्या दैनंदिन गरजा भागविल्या जाऊ शकतात. या नैसर्गिक संपदेचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोक एनव्हिर्रांमेंट इनिशिएटीव्हने पुढाकार घेऊन नागपूर महानगरपालिकेला दिलेले सहकार्य गौरवास्पद आहे. हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार व देशातील इतर राज्यही याची अंमलबजावणी करतील, असा विश्वास डॉ. रामनाथ सोनवणे यांनी व्यक्त केला.
यावेळी नागपूर स्मार्ट सिटी, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट व आयसीएलईआयच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे प्रोजेक्टचे महत्त्व विषद केले व याबाबत उपस्थितांकडून सूचना मागविल्या. शहरातील विविध संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रकल्पासंदर्भातील आपल्या शंका उपस्थित करून त्यांचे निरसरण करून घेतले.
अधिक वाचा : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची दीक्षाभूमीला भेट