नागपूर : तडिपारीची कारवाई होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुन्हेगार पवन परमानंद मोरयानी याला पाचपावली पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाइल अटक केली. तडिपारीचा आदेश बजावून त्याला भंडारा येथे सोडण्यात आले.
पवन हा कुख्यात नौशाद-इप्पा टोळीचा सदस्य आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या बॉबी माकन हत्याकांडात पवनचे नाव चर्चेत आले होते. माकन हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी कुख्यात लिटिल सरदारसह चार जणांना अटक केली होती. या हत्याकांडाचा अन्य एक सूत्रधार मनजितसिंग वाडे हा अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही. या हत्याकांडात नाव चर्चेत आल्यानंतर पवन हा फरार झाला होता. याचदरम्यान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई केली. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. पाचपावली पोलिस पवन याचा शोध घेत होते. याचदरम्यान सोमवारी पहाटे पवन हा नागपुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश सुरोशे, उपनिरीक्षक गोडबोले, चिंतामण डाखोळे, रविशंकर मिश्रा, सारीपूत्र फुलझेले, विजय जाने व सुनील वानखेडे यांनी कमाल चौकात सापळा रचला. पवन कारने तेथे आला. पोलिसांना बघाताच बघताच त्याने कारचा वेग वाढविला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. कार घरासमोर उभी करून पवन घरात घुसला. पोलिसांनी त्याला बाहेर येण्यास सांगितले. मात्र तो बाहेर आला नाही. तब्बल दोन तास पोलिस त्याची वाट बघत होते. अखेर पोलिसांनी घरात जाऊन त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. त्याला बाहेर येण्याची शेवटी संधी दिली. त्यानंतर त्याच्या काकाने पवन याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला तडीपारीचा आदेश बजावला. त्याला भंडारा येथे सोडले. पवन याच्याविरुद्ध विनयभंगासह दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
अधिक वाचा : नागपुर के प्रणय बांडबुचे ने की एवरेस्ट फतह