अमरावती, दि. 1 : जिल्ह्यात 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, ‘मिशन बिगीन अगेन’ मोहिमेत दि. 3 जून, 5 जून व 8 जून अशा तीन टप्प्यांत विविध सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
त्यानुसार मास्कचा वापर व सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींत किमान सहा फुटांचे अंतर बंधनकारक करण्यात आले असून, त्याचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल व पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. कार्यक्रम, मेळावे, सभांना परवानगी दिलेली नाही. लग्नसोहळ्यात 20 नागरिकांना उपस्थित राहता येईल. कार्यालये व आस्थापनांनी जास्तीत जास्त लोकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. गर्दी टाळण्यासाठी शिफ्टनुसार काम करावे. सर्व ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर आदी व्यवस्था असावी. सर्व नागरिकांना रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील बालके, आजारी व्यक्ती व गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळता बाहेर पडू नये, असे आदेश आहेत.
प्रतिबंधक क्षेत्रात आपत्कालीन अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही व्यक्ती तपासणी केल्याशिवाय बाहेर सोडू नये, असे आदेश आहेत.
मिशनचा पहिला टप्पा (दि. 3 जूनपासून)
सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी शारीरीक कसरती, जॉगिंग, धावणे यासाठी सकाळी 5 ते 7 या वेळेत मुभा असेल. सामूहिक हालचालींना प्रतिबंध किंवा जास्त अंतरापर्यंत जाता येणार नाही. सायकलिंगचा वापर अधिक करावा जेणेकरून अंतर राखले जाईल. प्लंबिंग, वीजदुरुस्ती आदी स्वयंरोजगार करणा-या व्यक्तींनी अंतर व इतर दक्षता पाळून कामे करावीत. वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजने ग्राहकांना वेळा देऊन स्वतंत्रपणे बोलवावे व गर्दी टाळावी. शासकीय कार्यालयातील आस्थापनांत पंधरा टक्के किंवा कमीत कमी 15 यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
मिशनचा दुसरा टप्पा (दि. 5 जूनपासून)
सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठेतील दुकाने (मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) पी-01, पी-02 या तत्वावर अर्थात रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेस व दुस-या बाजूची विषम तारखेला सकाळी 9 ते 5 या वेळेत चालू करता येतील. त्यासाठी परवानगी प्रक्रिया व इतर नियोजन महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीने करावे. ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी. कपडे खरेदी करताना ट्रायलरूम वापरण्याची परवानगी नाही. खरेदी केलेला माल बदलण्याची किंवा परत करण्याची परवानगी नाही. सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धती व घरपोच सेवेवर भर द्यावा. ग्राहकांनी वाहनाऐवजी चालत जाणे किंवा सायकलचा वापर करावा. दूरचा प्रवास टाळावा.
मिशनचा तिसरा टप्पा (दि. 8 जूनपासून)
खासगी कार्यालयात दहा टक्के स्टाफ बोलावता येईल. परवानगी अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही उपक्रमास कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगीची गरज राहणार नाही. क्रीडा संकुल, क्रीडांगणेही वैयक्तिक व्यायामासाठी खुली असतील. सांघिक खेळांना मनाई आहे.
आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्केच्या मर्यादेत प्रवासी वाहतूक करता येईल. निर्जंतुकीकरण व सोशल डिस्टन्स आदी बाबी पाळाव्यात. ‘एसटी’च्या विभागीय नियंत्रक तसे नियोजन करतील.
परवानगी प्राप्त दुकाने व आस्थापनांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 असेल. ई-कॉमर्स क्षेत्रात सेवांना परवानगी आहे. परवानाप्राप्त उपाहारगृहांमार्फत घरपोच सेवा देता येईल. ऑनलाईन शिक्षणावर अधिकाधिक भर द्यावा. टॅक्सी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये चालकासह तीन व दुचाकीवर एकजण जाऊ शकेल. आरोग्यसेतू ॲपचा वापर करावा. अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा व मालवाहतूक सुरु राहील. बँकिंग सेवा त्यांच्या वेळेत सुरु राहतील.
संचारबंदीच्या काळात खालील सेवा प्रतिबंधित असतील
1. शाळा, महाविद्यालये, शिकवणी, कोचिंग क्लासेस
2. चित्रपटगृहे, मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृहे, बार, प्रेक्षकगृहे, मंगल कार्यालये आदी
3. सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम
4. धार्मिक स्थळे, पूजास्थळे
5. केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर
6. सर्व प्रकारचे शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, लॉजिंग
Also Read- रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित