नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मागील काही महिन्यापासून नागपूर शहरात व्यापाऱ्यांना लागू करण्यात आलेला ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील व्यापारी ऑड – ईवन समाप्त करण्याची मागणी करीत होते.
रस्ता दुभाजक असलेल्या सर्व मार्गावरील ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. तसेच शहरातील दुकाने सायंकाळी ७ ऐवजी रात्री ९ पर्यंत सुरू ठेवता येतील. मात्र ऑड- ईवन समाप्त करताना ठेवण्यात आलेल्या अटी व शर्ती मुळे या घोषणेचा लाभ सरसकट सर्व व्यापाऱ्यांना मिळालेला नाही. महाल इतवारी व सीताबर्डी यासारख्या बाजारपेठात प्रमुख रस्त्यावर रस्ता दुभाजक नसल्याने व रस्ते अरुंद असल्याने या भागात ऑड- ईवन कायम राहणार आहे.
ज्या मार्गावर रस्ता दुभाजक आहे. रस्ते रुंद आहेत, अशाच मार्गावरून व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने वर्धा मार्ग, गोकुळ पेठ,सदर, मानेवाडा रोड, सक्करदरा, भंडारा मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, मेडिकल चौक परिसर, कामठी रोड यासह रस्ता दुभाजक असलेल्या मोठ्या रस्त्यांवरील व्यावसायिकांचा समावेश आहे..
इतवारी व महाल भागातील व्यापाऱ्यांना लाभ नाही
शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इतवारी व महाल परिसरातील रस्ते अरुंद असल्याने येथील व्यापाऱ्यांना ऑड- ईवन समाप्त करण्याचा त्याचा लाभ होणार नाही. अशीच परिस्थिती अरुंद रस्ते असलेल्या भागातील आहे.