पुणे – सुरुवातीला जवळपास दीड महिना ओढ दिल्यानंतर ऑगस्टमध्ये जोरदार बरसलेल्या मान्सूनने पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी गाठली असून, आता उरलेल्या महिनाभरात केवळ दोन आठवडेच पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यादरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा तीन टक्के अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत आठ राज्ये वगळता देशात सर्वदूर सामान्य पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.
तर केरळ या एकाच राज्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीदरम्यान केरळमध्ये २४३१ मिलिमीटर पाऊस झाला. सामान्य पावसापेक्षा हे प्रमाण ३१ टक्के अधिक आहे.
याशिवाय ओडिशात सामान्यपेक्षा १२ टक्के, सिक्किममध्ये ११ टक्के, तेलंगणात १० टक्के, जम्मू-काश्मिरात ८ टक्के, मिझोरममध्ये ७ टक्के, महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये ३ टक्के व कर्नाटकमध्ये दोन टक्के अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले. उत्तरेकडील हरियाणा वगळता उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबसह इतर सर्व राज्यांत सामान्य पर्जन्यमान नोंदविण्यात आले.