नागपुर :- शहरातील मनपा च्या शाळा अगोदरच दुरावस्थापासून बदनाम आहे त्यात आणखी भर पडली ती शाळांमध्ये आता विद्यार्थी असताना शिक्षकच नाही. त्यामुळे सध्या माध्यमिक शाळांमधील शिक्षक केवळ वर्गसंचालन करीत असल्याचा प्रकार शहरात होत आहे.
या शाळांमध्ये गेल्या एक तपापासून कार्यरत असलेल्या घड्यायाळी तासिका शिक्षकांना अचानक कामावरून कमी केल्याने हा प्रकार सामोरा आला आहे. दरम्यान, यासंदर्भात जाहिरात दिलेल्या कंत्राटी घड्याळी तासिका शिक्षकांच्या मुलाखती आज गुरुवारपासून सुरू होत असून, सोमवारपासून कनिष्ठ महाविद्यालयीन वर्ग नियमितपणे भरतील, असा दावा मनपा कडून करण्यात आला आहे. तर, शिक्षण समिती सभापतींनी यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्व ४२ घड्याळी तासिका शिक्षकांना रूजू करून घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
मागील दहा वर्षांपासून नाममात्र पगारावर कार्यरत असलेल्या ४४ घड्याळी तासिका शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांना कंत्राटीपद्धतीवर परत रूजू होण्यासाठी जाहिरात काढून अर्ज करण्यास सांगण्यात आले.
या जाहिरातीत कंत्राटीपद्धतीवर नियुक्तीसाठी ६५ वर्षे वयापर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे सेवानिवृत्त झालेल्यांना परत सेवेत रूजू होता येणार आहे, तर मनपात घड्याळी तासिका पद्धतीवर कार्यरत शिक्षकांनाही अर्ज केल्यानंतर रूजू होता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे काही दिवस मनपात या शिक्षकांनी ठाण मांडून आपली व्यथा मांडली होती.
मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शाळांची धुरा या सर्व घड्याळी तासिका शिक्षकांवर होती. मनपाच्या आसीनगर येथील एमएके आझाद शाळेत इयत्ता १२ वी ३०० विद्यार्थी आहेत. इयत्ता ११ वीत आतापर्यंत ८० प्रवेश झाले आहेत. या शाळेत १५ शिक्षकांची गरज असून, हे सर्व घड्याळी तासिकांवर काम करीत होते. ताजाबाद येथील कनिष्ठ महाविद्यालयातही इयत्ता १२ वीत ३२ विद्यार्थी आहेत.इयत्ता ११ वीचे प्रवेशसुरू आहेत. येथेही घडयाळी तासिकांचे शिक्षकच कार्यरत होते. उंटखाना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातही इयत्ता १२वी व ११वीचे प्रवेश झाले आहेत. या शाळेत काहीच शिक्षकांची गरज आहे.
महालातील साने गुरुजी उर्दू शाळेत ४० विद्यार्थी असून,येथे केवळ उर्दू माध्यम आहे. येथेही शिक्षक नाही. त्यामुळे मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा चांगला निकाल आणून देणाऱ्या घड्याळी तासिका शिक्षकांना कामावरून कमी केल्याने या चारही शाळांमध्ये विद्यार्थी असताना, शिक्षकच नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थी पळून जावू नये वा अडचण येऊ नयेत म्हणून माध्यमिक शाळांमधील शिक्षक केवळ वर्गाचे संचालन करीत आहे.
यावरून मनपातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल सुरू असलेल्या अनास्थेचा परिचय होतो. आधीच मनपा शाळेतील विद्यार्थी खासगी शाळा पळवून नेत असल्याचा वा पालकवर्ग आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी नाव काढून घेत आहेत. असे असताना इयत्ता ११ वी व १२ वीत चांगल्या संख्येत विद्यार्थी असताना शिक्षकच नाहीत, असे चित्र आहे.
अधिक वाचा : त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता : भाई जगताप यांची टीका