आता मनपाला मिळणार वर्षाकाठी १०३८ कोटी जीएसटी अनुदान

Date:

नागपूर : नागपूर महानगरपालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या ६२४ कोटींच्या अनुदानात भरघोस वाढ शासनाने केली असून यापुढे आता वर्षाकाठी १०३८ कोटींचे अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ता. १७ मुंबईत घेतलेल्या एका शासकीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयाबद्दल पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात एलबीटी लागू होण्यापूर्वी ऑक्ट्रॉयच्या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे ७५० कोटी रुपये मनपाला उत्पन्न होत होते. एलबीटी लागू झाल्यानंतर त्याचा विरोध नागपुरातूनच सुरू झाला. या विरोधामुळेच एलबीटी भरणाऱ्या नागपुरातील व्यापाऱ्यांची संख्या कमी होती. एलबीटी संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण देशात जीएसटी लागू करण्यात आला. एलबीटीच्या उत्पन्नाच्या सरासरीत जीएसटीचे अनुदान ठरले. मुळातच नागपुरातील एलबीटीच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्न अल्प असल्याने इतर शहरांच्या तुलनेत नागपूरला जीएसटीचे अनुदान अपेक्षेपेक्षा कमी मिळत होते. महिन्याला ५२ कोटी अर्थातच वर्षाकाठी केवळ ६२४ कोटींचे अनुदान प्राप्त होत होते.

यासंदर्भात महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनुदान वाढीसाठी साकडे घातले. स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सातत्याने शासनाकडे याचा पाठपुरावा केला आणि जीएसटी अनुदान वाढीची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सकारात्मक संकेत दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनुदान वाढीसाठी मदत केली. त्यांच्या शिफारसीमुळे अनुदान वाढीचा मार्ग मोकळा झाला. अखेर मनपा पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात शनिवारी (ता. १७) मुंबई आयोजित बैठकीत निर्णय घेतला. आता नागपूर महानगरपालिकेला महिन्याकाठी ८६.५० कोटींचे अनुदान प्राप्त होणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

विकासाला मिळेल चालना : वीरेंद्र कुकरेजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या जीएसटी अनुदानात वाढ केल्यामुळे नागपूर शहरात खोळंबलेल्या विकास कामांना चालना मिळणार आहे. हा निर्णय म्हणजे नागपूर महानगरपालिकेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी माझ्यासह सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो आणि मनपाच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि नागपूरकर जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो.

अधिक वाचा : रहदारीची व्यवस्था सुधारण्यासाठी नागपूर मेट्रोची सायकल स्टॅन्ड उपाययोजना

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related