नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधित दूध मोफत मिळणार आहे. यासंदर्भातील नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीने गुरूवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात घेतलेल्या बैठकीमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला.
यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती भारती बुंडे, सदस्या प्रमिला मंथरानी, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, मनोज गावंडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आदिवासी शाळा, महापालिकेच्या शाळांना विनामूल्य सुगंधित दूध देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांना सुगंधित दूध देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण समितीने प्रस्ताव पारित केला असल्याची माहिती समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. शासनाच्या अटी व शर्तीनुसार दुधाची गुणवत्ता व लेबल नुसार त्यात कॅलरिज, प्रोटिन्सचे प्रमाण किती आहे याची पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले.
या राज्यस्तरीय योजनेचे उद्घाटन नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये शनिवारी ११ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह शहरातील सर्व खासदार व सर्व आमदार, नगरसेवक हे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिक वाचा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन