युद्ध हरल्यावर माणूस संपत नाही, तर रणांगण सोडल्यावर त्याची हार होते : नितीन गडकरी

Nitin Gadkari , नितीन गडकरी Nagpur

नागपूर : ”कोरोनाच्या लढाईत संपूर्ण जग हे रणांगण झाले आहे आहे. सर्व देश आपआपल्या परीने ही लढाई लढत आहेत. पण इतर प्रगत देशांपेक्षा भारताची लढाई उत्तम सुरु आहे, आपण यशस्वी होतोय. लक्षात ठेवा, युद्ध हरल्यावर माणूस संपत नाही, तर युद्धभूमी सोडून गेल्यावर तो संपतो. त्यामुळे या युद्धजन्य परीस्थितीत आपल्याला मैदान सोडायचे नाही, तर संपूर्ण आत्मविश्‍वासाने आणि ताकदीने हे युद्ध लढायचे आहे. फारच फार एक-दीड महीन्यात आपण हे युद्ध जिंकू,” असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

फेसबुकच्या माध्यमातून गडकरींनी देशवासीयांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, ”जीवनात समस्या येतात आणि जातात. पण यामुळे संकटांवर मात करण्याची क्षमता आपल्यांत निर्माण होते. आपल्या देशात सरकारमध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरुन न जाता लढण्याची गरज आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात हे संकट गडद झाले असताना आपण योग्य पद्धतीने उपाययोजना करीत आहोत. आता सकारात्मक पद्धतीने या संकटाकडे पहावे लागणार आहे.”

छोट्या गोष्टींतूनच कोरोनावर करता येईल मात

ते पुढे म्हणाले, ”सरकारने वेळोवेळी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या लढाईत आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे सामाजिक अंतर पाळणे, बाजारात, किराणा दुकानात गर्दी न करणे, बाहेर असताना वेळोवेळी सॅनिटायझर आणि साबण-पाण्याने हात धुणे. शक्‍यतोवर घरात राहूनच काम करावे आणि फारच गरज भासली तर बाहेर जावे आणि जाताना मास्कचा वापर करणे. या लहान-लहान गोष्टी करुनच आपण कोरोनावर मात करु शकतो.”

केंद्राच्या उपाययोजनांची दिली माहिती

”केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे काही उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन काही उद्योग सुरु करता येतील. तेथे सरकारच्या नियमांनुसार कामगारांची भोजन आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात येईल. भारताची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. यासाठी सरकारने काही महत्वाची कामे केली आहेत, सरकारने माल वाहतूक, बंदरे, निर्यात चालू केली. कारखाने (काळजीपूर्वक) चालू करायला परवानगी दिली आहे. आरोग्य आणि सुरक्षा वस्तूंचे वेगवान उत्पादन सुरू केले आहे. चीनमधून येणाऱ्या औषधांची कच्च्या मालाची आयात बंद करून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे. सर्व हायटेक वैद्यकीय उपकरण उत्पादने भारतात तयार होण्यासाठी पहिला डीव्हाईस पार्क विशाखापट्टणम येथे सुरु करण्यात आला आहे. देशात असेच चार नवे पार्क लवकरच सुरु करण्यात येतील.” अशी माहिती त्यांनी दिली.

रस्ते बांधणीला देणार वेग

”संपूर्ण जगातून जपान आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत होती. पण आता बव्हंशी देश चीनसोबत व्यवहार करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे तेथील गुंतवणूक बाहेर हलविली जाणार आहे. अमेरिका व चीनकडून आपण आयात थांबवणार आहोत. याचा भारतीय उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. देशभरात रस्ते बांधकामाचा वेग दुप्पट करण्यात येईल. सात नवीन हायवेंचे काम सुरु करण्यात आले आहेत. नदी वाहतूक व नदीजोड प्रकल्प चालू होणार. ब्रॉडगेज मेट्रो लवकरच सुरू करणार. सुरुवातीला गोंदीया-बडनेरा आणि गोंदीया-नरखेड ही ब्रॉडगेज सुरु करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

राजकारण विसरुन एकजुटीने प्रयत्न करु

”उद्योगांना जास्त भांडवल देणार, टॅक्‍स भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात येईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राथमिकता देण्यात येणार आहे. तीन वर्षात 5 लाख कोटी वार्षिक उलाढालीचे लक्ष्य सरकारने निर्धारीत केले आहे. पेट्रोल, तेलबियांची आयात कमी करण्यासाठी ग्रामीण उद्योगांमार्फत बायोडीझल आणि इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्यात येईल. दुग्ध, कुक्कुट उद्योग वाढवण्यासाठीही योजना राबविण्यात येणार आहेत. इलेक्‍ट्रॉनिक आणि वृत्तपत्रांच्या प्रिंटींग पेपरची आयात कमी करण्यासाठी योजना लागू करण्यात येणार आहे. भारताला लवकरच 5 ट्रीलीयन सुपरपॉवर बनविण्यासाठी राजकारण विसरुन एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील,” असेही गडकरी म्हणाले.

निर्यात वाढवण्यावर भर देणार

आयात कमी करुन निर्यात वाढविण्यावर यापुढे भर राहणार आहे आणि कोरोनावर मात केल्यानंतर सर्व कामांचा वेग दुपटीने वाढविण्यात येणार आहे. हे सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निकसन यांच्या आत्मचरीत्रातील एक वाक्‍य त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “वॉटरगेटच्या कारणावरुन लोक त्यांच्यावर नाराज होते. तेव्हा त्यांनी वॉशिंग्टनमध्ये जागा घेतली होती. तेथील लोकांनीही त्यांना तेथे येण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी त्यांचा अपमान झाला. पण ते लढत होते. तेव्हा त्यांनी आत्मचरीत्र लिहिले आणि त्यात एक वाक्‍य होते, ते माझ्या जीवनात मी नेहमी लक्षात ठेवतो. ते म्हणजे, ‘मॅन ईज नॉट फिनीश्‍ड व्हेन ही ईज डिफीटेड, बट ही ईज फिनिश्‍ड व्हेन ही क्वीट्‌स.’ युद्धभूमीवर हरल्यानेतर माणुस संपत नाही, तर तो युद्धभूमी सोडतो तेव्हा तो संपतो.”

त्यामुळे ही संकटं, समस्या, आव्हानं आपण स्विकारुन कोरोनाची लढाई लढावी आणि त्यानंतर आपल्या देशाला, अर्थव्यवस्थेला अधिक बळकट बनविण्याचा संकल्प करु, असे आवाहन गडकरी यांनी देशवासीयांना संबोधित करताना शेवटी केले.

Also Read- डेंजर झोनमधील नागपूरकरांसाठी दिलासा; कोरोनाच्या 250 चाचण्या निगेटिव्ह