नागपूर : नागपूर परिमंडळातील सेमिनरी हिल्स तसेच अजनी उपकेंद्रात नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून या परिसरात राहणाऱ्या हजारो ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळून त्यांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. एकात्मिक विद्युत विकास योजना अंतर्गत ही कामे करण्यात आली.
नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी ) सुहास रंगारी यांच्या हस्ते सेमिनरी हिल्स उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, प्रादेशिक कार्यालयातील अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अविनाश सहारे, खोब्रागडे नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय कोलते आदी अधिकारी उपस्थित होते. या नवीन रोहित्रामुळे परिसरातील हजारीपहाड,आकारनगर, जागृती कॉलनी, गौरखेडे कॉम्प्लेक्स, वायुसेना नगर, नर्मदा कॉलनी, सुरेंद्रगड, भीमटेकडी, म्हाडा कॉलनी येथील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
अजनी येथेही १० एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे अजनी, प्रशांत नगर, समर्थ नगर व परिसरातील हजारो ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी अजनी केवळ स्विचिंग स्टेशन होते तेथे रोहित्र बसविण्यात आल्याने ते उपकेंद्र झाले आहे.