नागपूर, ता. २८ : नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (ता. २८) पदाचा कार्यभार स्वीकारला.
श्री. तुकाराम मुंढे यांनी सकाळी ९.३० वाजता कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेच त्यांनी विभागप्रमुखांच्या बैठक घेत नागपूर महानगरपालिकेतील विविध विभागांची माहिती जाणून घेतली. सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना आणि निर्देश दिले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कामे करावीत. आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ओळखून कामे करावीत, असे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले.
यानंतर दिवसभर सर्व विभागाच्या विभागप्रमुखासमवेत त्यांनी बैठक घेतली. बैठकांचे सत्र दिवसभर सुरू होते. सर्व विभागप्रमुखांनी संबंधित विभागाची माहिती आणि कामांचा गोषवारा तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आयुक्तांचा जनता दरबार
नागपूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी आता सरळ आयुक्तांसमोर सादर करता येणार आहे. यासाठी कुठल्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. कुठल्याही नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आयुक्तांना भेटून आपले गाऱ्हाणे मांडता येईल. आयुक्तांचा जनता दरबार दररोज राहणार असून नागरिकांनी कुठलीही अडचण असल्यास जनता दरबाराच्या नियोजित वेळेत येण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा परिचय
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे नागपुरात रुजू होण्यापूर्वी राज्य एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून कार्यरत होते. सन २००५ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी त्यांनी नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला असून आयुक्त म्हणून नागपूर महानगरपालिका ही तिसरी महानगरपालिका आहे. नागपुरात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सन २००८ मध्ये कार्य केले आहे. पुण्यात पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात त्यांचा जन्म झाला असून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. औरंगाबाद येथून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.