रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली. त्यामुळे आता भाजप पक्ष याविरोधात काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगायला सुरुवात झाली होती.
डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचे समजताच देवेंद्र फडणवीस प्रथम विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणि नंतर मुंबई पोलिसांच्या झोन 8 च्या कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी रात्री याठिकाणी हायव्होल्टेज नाट्य रंगले होते. या सगळ्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची बाजूही मांडली होती.
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रूक फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.