नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात पूल, रस्ते बांधणीची कामं बंद करा, अशी धमकी नक्षलवाद्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. त्यातून सरकारला धमकी देण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी सी-६० कमांडोजची एक जीप भुसूरुंग स्फोट करून नक्षलवाद्यांनी उडवून दिली होती. या स्फोटात एकूण १६ जवान ठार झाले होते. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गडचिरोलीत ठिकठिकाणी धमकीचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. गडचिरोलीत रस्ते व पूल बांधणं बंद करा, असं या पोस्टर्समधून सांगण्यात आलं आहे.
भांडवलदारांची चमचेगिरी करणाऱ्यांचे मनसूबे पूर्ण होऊ देणार नाही, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने गडचिरोलीत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ ला रामको नारकोटी हिचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. या दोन्ही घटनांचा निषेध नक्षलवाद्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे.
स्थानिक पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळाला भेट दिली आहे. या भ्याड हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निषेध केला आहे.
अधिक वाचा : Naxalites burn down 36 vehicles in Gadchiroli