नागपूर : जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदस्यांसाठी अधिकृत कक्ष नसल्याने सभापतीच्या कक्षात कुणीच नाही म्हणून पत्रपरिषद सुरू केली. पत्रपरिषद सुरू असतानाच सभापती आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरल्याने विरोधकांना जि.प.च्या वऱ्हांड्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.
विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्य राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर, कैलास बरबटे, राधा अग्रवाल, व्यंकट कारेमोरे आदी उपस्थित होते. समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली असतानाच, त्या आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरला. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या कक्षातून काढता पाय घेत, जिल्हा परिषदेच्या वºहांड्यातच पत्रकारांना माहिती दिली. विरोधी सदस्यांना बसायलाही जागा नाही, अशी ओरड करीत, कुलूपबंद असलेल्या एका कक्षाचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे या पत्रपरिषदेला विरोधी पक्षनेता यांच्यासोबत समाजकल्याण समिती सदस्यसुद्धा उपस्थित होते. सदस्यांचे म्हणणे आहे की, समाजकल्याण सभापतींचा कक्ष खाली होता. आम्ही त्यांच्या खुर्चीवर बसलो नव्हतो. कक्षात त्यांची कुठलीही बैठकही नव्हती. आम्हाला त्यांच्यापुढे माहिती देण्यास काही हरकतही नव्हती. पण लवकर आटोपा, असा आग्रह करीत त्यांनी सदस्यांचा अपमान केला आहे.
अध्यक्षांच्या कक्षातही झाला सदस्याचा अपमान
एका कामासाठी सदस्य राधा अग्रवाल या अध्यक्षांच्या कक्षात गेल्या. अध्यक्ष नव्हते, पण त्यांचे पती तेथे उपस्थित होते. ते काही लोकांसोबत चर्चा करीत होते. त्यांनी महत्त्वाची बैठक असल्याचे सांगून, तुम्ही बाहेर थांबा असे अग्रवाल यांना सांगितले. अध्यक्ष नसताना त्यांच्या कक्षात त्यांचे पती बैठका घेतात आणि सदस्यांना बाहेर उभे करतात, या घटनेचाही त्यांनी निषेध केला.
– आम्ही या घटनेचा निषेध करतो. सीईओंनी विरोधकांसाठी एक कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सीईओंकडे करणार आहे.
अनिल निधान, विरोधी पक्षनेता