नागपूर – व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर

नागपूर : अनुत्तीर्ण झाल्याने व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास व्हीएनआयटीतील वसतिगृहात घडली. गणपुरम व्यंकटा सूर्यनारायणा (वय १९, मूळ रा. कोरबा, छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. तो बीटेकच्या मायनिंग अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मित्रांशी बोलला. त्यानंतर वसतिगृहात गेला. मात्र, बाहेर निघाला नाही. सायंकाळी नातेवाईक व मित्रांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्राने सुरक्षा अधिकाऱ्याला याबाबत सांगितले. दोन सुरक्षारक्षकांनी दार तोडले असता गणपुरम गळफास घेतलेला दिसला.

सुरक्षा अधिकाऱ्याने घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक, हेडकॉन्स्टेबल रमेश कन्हेरे, स्वाती कुबडे आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. गणपुरमच्या आत्महत्येची माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : नाबालिग से मिलीं लाखों की बैटरियां