नागपूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने विदर्भात पुढील चार दिवस सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात १ ते ३ जुलैदरम्यान भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तेथील प्रशासनाने सतर्क राहावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून विदर्भात मान्सून समाधानकारकपणे बरसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शनिवारी नागपुरात पावसाच्या दमदार सरींनी हजेरी लावली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने नागपूकरांना आनंद बहाल केला. यंदाच्या मोसमात शनिवारी पहिल्यांदा विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यात चंद्रपूर येथे सर्वाधिक ३६ मिलिमीटर तर वाशीम येथे सगळ्यात कमी २ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. रविवारी नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र फारसा पाऊस झाला नाही.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत चालला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. ३० जूनपासून छत्तीसगड, तेलंगण, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेश या भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यांमध्ये २४ तासांत २०४ मिलिमीटरहून अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रशासनाने या काळात सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
अधिक वाचा : सिर्फ नागपुर मेट्रो में होंगी ईव्हेक्यूएशन चेयर की सुविधा