नागपूर : महावितरणच्या पेमेंट वॉलेटसाठी विदर्भातून सर्वाधिक (१०५) अर्ज

नागपूर : वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी महावितरणकडून सुरु करण्यात आलेल्या पेमेंट वॉलेट या सुविधेसाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातून तब्बल ६६८ जणांनी अर्ज केले आहेत. आवश्यक असलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता केल्यावर या व्यक्ती अथवा संस्थांना पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून महावितरणकडून वीजदेयक वसुलीची परवानगी देण्यात येणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक १०५ अर्ज यवतमाळ जिल्ह्यातून आले आहेत. नागपूर ग्रामीण मंडळातून ५४, शहर मंडळातून ७ तर भंडारा जिल्ह्यातून ८६, बुलडाणा जिल्ह्यातून ८४, गोंदिया जिल्ह्यातून ५६ जणांनी या महावितरणच्या पेमेंट वॉलेट साठी अर्ज केले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांसाठी पेमेंट वॉलेट या सुविधेचे उदघाटन करण्यात आले होते. महावितरण पेमेंट वॉलेट सुविधा घेणाऱ्या व्यक्तीला महावितरणकडून प्रति ग्राहक पाच रुपये कमिशन देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांसाठी ही सुविधा सुरू केल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी होणारी पायपीट वाचणार आहे. गावातील पेमेंट वॉलेट असलेल्या व्यक्तीकडून गामीण भागातील वीज ग्राहक देयकाची रक्कम भरू शकतात.

संपूर्ण पारदर्शक असलेल्या महावितरण पेमेंट वॉलेट योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यापारी असल्यास जिएसटी क्रमांक, दुकान नोंदणी क्रमांक, राहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रद्द केलेला धनादेश आदी कागदपत्रे महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर असलेल्या लिंकवर अपलोड करावी लागणार आहेत. महावितरणकडे अर्ज प्राप्त झाल्यावर उपविभागीय कार्यालयाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. आलेले सर्व अर्ज मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तेथून अर्जाला मंजुरी मिळणार आहे. अर्जदाराला सर्व माहिती त्याने नमूद केलेल्या ई-मेल आणि नोंदणी केलेल्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. यासाठी अर्जदारास महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही.

‘टॉपअप’ची सुविधा

एकदा अर्जदारास पेमेंट वॉलेटच्या द्वारे पैसे स्वीकारण्याची परवानगी मिळाल्यावर सुरुवातीला किमान ५ हजार रुपयांचे डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून टॉपअप करावे लागणार आहे. वॉलेटधारक महावितरण मोबाइल अॅपमध्ये नोंदणी करून वीज ग्राहकांच्या देयकाची रक्कम स्वीकारू शकतील. वॉलेटच्या माध्यमातून देयकाचा भरणा केल्यावर वीज ग्राहकास महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल वर पैसे भरल्याचा संदेश मिळणार आहे. कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, व्यापारी, वीज मीटर रिडींग करणारी संस्था, महिला बचत गट महावितरणचे वॉलेटधारक होऊ शकतात. महिना अखेरीस कमिशन अर्जदाराच्या वॉलेटमध्ये जमा होईल. महावितरण पेमेंट वॉलेटमुळे ग्रामीण भागात युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामुळे अधिकाधिक व्यक्तींनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी केले आहे.

अधिक वाचा : Scholarship issue : Scholarship fiasco continues, NCPI mapper creates problems