नागपूर – उन्हाळी परीक्षांचे विक्रमी निकाल

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेल्या चार वर्षांत झालेल्या परीक्षा सुधारणांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. त्यामुळेच विक्रमी कालावधीत सुमारे ९० टक्के निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर प्रवेशदेखील त्यामुळे सुकर झाले आहेत.

नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी गेल्या चार वर्षांत परीक्षा पद्धतीत अमुलाग्र सुधारणा केल्यात. ऑनलाइन प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठवण्यापासून तर ऑनस्क्रीन उत्तरपत्रिकांच्या तपासणीपर्यंतचे बदल त्यांनी टप्प्याटप्प्याने घडवून आणले. त्याशिवाय परीक्षांच्या वेळापत्रकात देखील अनेक सुधारणा केल्याने ज्या परीक्षांना तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत होता, त्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा आयोजनातील कालावधी कमी होत असतानाच उत्तरपत्रिका तपासणीला वेग देखील देण्यात आला. त्यामुळे ९० टक्के निकाल हे ३० दिवसांच्या आत घोषित होऊ लागले आहेत.

राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाचा व्याप मोठा आहे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ च्या परीक्षेत सुमारे चार लाख २५ हजार विद्यार्थी बसले होते. त्या विद्यार्थ्यांच्या एकूण ११०३ परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात चार विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर कोर्सचे सुमारे ५ हजारांहून अधिक पेपर्स होते. तर सुमारे २४ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली.

विद्यापीठाने प्राध्यापकांच्या मदतीने त्या २४ लाख उत्तरपत्रिकांची अत्यंत गतीमान तपासणी करून १०२६ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. तर ५३ निकाल प्रसिद्ध होण्याच्या तयारीत आहेत. या परीक्षा मार्च ते जुलै या कालावधीत तीन टप्प्यात घेण्यात आल्या होत्या.

आकडेवारी अशी

एकूण विद्यार्थी : ४ लाख २५ हजार

एकूण परीक्षा : ११०३

निकाल जाहीर : १०२६

प्रश्नपत्रिका : ५ हजार

उत्तरपत्रिका २४ लाख

अधिक वाचा : नागपूर : अखेर एसीबीला मिळाले अधीक्षक