नागपूर : प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर आता महाविद्यालयांमध्ये द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. काही महाविद्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी ऑनलाईन प्रवेशाची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांत बोलविले जात आहे व त्यामुळे प्रवेशासाठी गर्दी होत आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याने विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. खुलेआम महाविद्यालयांकडून ‘कोरोना’च्या नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने मौन साधले आहे.
केंद्र व राज्य शासनाने कोरोना संक्रमणापासून लोकांचा जीव वाचविण्यासाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत. मात्र अनेक महाविद्यालयांत त्यांचे पालनच होत नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेज येथे गुरुवारी प्रचंड गर्दी होती. विद्यार्थ्यांना दाटीवाटीने उभे राहावे लागत होते. सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थ्यांची लांब रांग दिसून आली. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविद्यालयांत प्रवेशासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येणार आहेत याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला अगोदरपासूनच होती. तरीदेखील काहीच काळजी घेण्यात आली नाही.शहरातील इतरही काही महाविद्यालयांत असेच चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविद्यालयाचा दावा, १०० विद्यार्थ्यांना बोलविले
यासंदर्भात धनवटे नॅशनल कॉलेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ १०० विद्यार्थ्यांनाच बोलविले व ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चेदेखील पालन करण्यात आले असा दावा केला. मात्र ‘लोकमत’कडे असलेल्या छायाचित्रांत वेगळेच चित्र दिसून येत आहे. कोणत्या १०० विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. इतर महविद्यालयांना विचारणा केली असता त्यांनी विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश केला. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेची स्पष्ट माहिती दिलेली नाही. प्रवेशाची मुदत संपण्याच्या काही दिवसअगोदर माहिती पुरविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे असे त्यांनी सांगितले.