नागपूर : विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबीने मोटरसायकलला धडक दिल्याने विद्यार्थ्यासह दोघे ठार तर एक युवक जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कळमन्यातील जबलपूर रिंगरोड येथे घडली.
पृथ्वीराज मनोहररराव जाधव (वय २१, रा. हाउसिंग बोर्ड, रघुजीनगर) व सुशांत नागदेवते (रा. आदिवासी कॉलनी) अशी मृतांची तर शुभम गुणवंतराव वाघ (वय २२, रा. आदिवासी कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पृथ्वीराज हा पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाला शिकत होता. सुशांत हा कॅटरिंगचे काम करीत होता. रविवारी सुशांत, शुभम हे दोघे पृथ्वीराजच्या एमएच-४९- एएक्स-३२९५ या क्रमांकाच्या मोटरसायकलने रामटेक येथे दर्शनासाठी गेले. रात्री ते ट्रिपलसिट मोटरसायकलने नागपूरकडे येत होते. कळमन्यातील जबलपूर महामार्गवर एमएच-३४- एल-६६७९ या क्रमांकाचा जेसीबी यूटर्न घेत होता. अचानक जेसीबी मोटरसायकसमोर आला. मोटरसायकल जेसीबीवर आदळली. तिघेही गंभीर जखमी झाले. पृथ्वीराज व सुशांत या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक जेसीबी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी शुभम याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पंचनामा करून दोघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून जेसीबी चालकाचा शोध सुरू केला आहे.
काच फोडून जेसीबीच्या केबिनमध्ये पडला
मोटरसायकल सुशांत चालवित होता. त्याच्या मागे पृथ्वीराज व शुभम बसला होता. हा अपघात एवढा भीषण होता की मागे बसलेला शुभम हवेत उडाला. जेसीबीची काच फोडून तो केबिनमध्ये पडला, अशी माहिती आहे.
आईचा सहारा हिरावला
सुशांतच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याची आई निवृत्त परिचारिका आहे. सुशांत हा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई आजारी असते. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचा सहारा हिरवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पृथ्वीराजचे वडील स्कूलबसचालक आहेत. त्याला दोन बहिणी आहेत. शुभम बारावीत होता. तिघांनीही रामटेकला जात असल्याचे नातेवाइकांना सांगितले नव्हते. घटनास्थळावर आढळलेल्या दस्तऐवजांवरुन तिघांची ओळख पटली.
अधिक वाचा : नागपूर : गोंदियात स्फोटके जप्त