नागपूर : अपघातात अकोटच्या एका तरुणाचा जबडा विस्कळीत झाला होता. त्यावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू होती. तेव्हाच अचानक वीज खंडित झाल्याने शस्त्रक्रिया खोळंबली. त्याचवेळी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनरेटरमध्ये डिझेलच नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे रुग्ण ३० मिनटे शस्त्रक्रिया टेबलावर ताटकळत होता, परंतु सुदैवाने डॉक्टरांच्या विशेष प्रयत्नाने त्याचे प्राण वाचले.
सुनील अंबादास लटकुटे (२९) रा. आकोट असे रुग्णाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत फिटर आहे. तो १५ जानेवारीला मोवाला फाटा परिसरातून दुचाकीवर जात असताना त्याला चारचाकी वाहनाने धडक दिली. त्याला गंभीर अवस्थेत अकोलातील एका रुग्णालयात दाखल केले गेले. तीन दिवस उपचार केल्यावर त्याला नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात पाठवले गेले. तेथे प्रथम त्याचे एक्स-रे, सीटी स्कॅन काढल्यावर त्यात एकही फॅक्चर आढळला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्ण गंभीर नसल्याचे सांगत दाखल करण्यास नकार दिला. या गंभीर अवस्थेतही तो दोन दिवस थंडीत रुग्णालयाच्या बाहेर झोपला.
रुग्णासोबत त्याचा भाऊ अनिल लटकुटे होता. दोन दिवस रुग्णालयाच्या बाहेर झोपला असताना तो उलटी व इतरही त्रासाने त्रस्त असल्याने भाऊ वारंवार रुग्णाला डॉक्टरांकडे नेत होता. भावाच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याला दाखल करत पुन्हा त्याच्या काही चाचण्या केल्यावर त्याचा गुडघ्याचे हाड मोडल्याचे पुढे आले. त्यावर शस्त्रक्रिया केल्यावर त्याला सुटी दिली गेली. त्यानंतर तीन दिवस रुग्ण मेडिकलच्या बाहेर थंडीत ताटकळत राहिला. त्यानंतर त्याच्या जभड्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने तो विस्कळीत झाला होता.
त्यामुळे शासकीय दंत महाविद्यालयातील दंत शल्यक्रिया शास्त्र विभागाने त्याला सोमवारी दाखल करून घेतले. मंगळवारी त्याची शस्त्रक्रिया निश्चित झाली. त्याला शस्त्रक्रिया गृहात घेतल्यावर भूलीचे इंजेक्शन देत चिरा मारून शस्त्रक्रिया सुरू झाली. परंतु दुपारी दोन वाजता अचानक वीज पुरवठा खंडित झाला. शस्त्रक्रिया सुरू असताना वीज गेल्याने डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली. तातडीने जनरेटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. परंतु प्रशासनाने तब्बल सहा महिन्यापासून जनरेटरसाठी डिझेलच खरेदी केला नसल्याचा अक्षम्य प्रकार समोर आला.
त्यामुळे येथूनही वीज सुरू होणार नसल्याचे बघत तातडीने रुग्णाची प्रकृती खालवू नये म्हणून डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. दरम्यान एका डॉक्टरने खिशातून ५०० रुपये देऊन डिझेल मागवले. तातडीने एक कर्मचारी डिझेल घेऊन येईस्तोवर अर्ध्या तासाहून अधिक कालावधी लोटला. परंतु ३० मिनिटात वीज आल्यावर तातडीने ही जोखमीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी शिताफीने पूर्ण केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. परंतु या घटनेमुळे पुन्हा दंत रुग्णालयातील निष्क्रियतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे पुढे आले.
‘‘दंत रुग्णालयात शस्त्रक्रिया होणारा रुग्ण खूप गंभीर नसतो. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान, करोना काळात शस्त्रक्रिया जवळपास बंद असल्याने रुग्णांकडून प्रशासनाला उत्पन्न नसल्याने डिझेलसह इतर खरेदीवरही मर्यादा आल्या. तर या जनरेटरचे सेंसर खराब असल्याने त्यातील डिझेल संपल्याचे निदर्शनात आले नाही. परंतु वीज खंडित झाल्यावर तातडीने डिझेल खरेदी केल्यावर ३० मिनटांनी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. पुढे काळजी घेतली जाईल.’’ – डॉ. मंगेश फडनाईक, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.