तात्पुरती व्यवस्था सध्याच्या जागेवरच करा

नागपूर

नागपूर: रेल्वे स्थानकाच्या विकासाला आमचा विरोध नाही. आमच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. पण ही व्यवस्था होईपर्यंत आम्हाला सध्या असलेल्या जागेवरच तात्पुरती दुकाने उभारू द्यावी, अशी माागणी नागपूर रेल्वे स्टेशन दुकानदार असोसिएशनने केली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी रेल्वे स्थानकापुढील, टेकडी गणेश मंदिरापुढून जाणारा उड्डाण पूल तोडण्यात येणार आहे. हा पूल पाडला तर या पुलाखालील दुकानदारांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रेल्वे स्थानकाच्या विकास आराखड्यात राज्य परिवहन महामंडळ कार्यालय परिसरात या व्यावसयिकांना कायमस्वरूपी दुकाने बांधण्यात येणार आहेत. पूल पाडल्यानंतर आणि नवीन दुकाने होईपर्यंत आम्हाला पूल पाडलेल्या ठिकाणीच तात्पुरती दुकाने सुरू करू द्यावी, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तसे आश्वासन दिले होते, असे दुकानदार म्हणतात. मात्र, गडकरींनी तसे आश्वासन दिले असताना तात्पुरती दुकाने एसटीच्या जागेत उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ग्राहक येणार नाहीत, असे दुकानदारांना वाटते.

या पुलाखाली सध्या १७२ दुकाने आहेत. उड्डाणपूल होण्यापूर्वी येथे ७२ दुकाने होती. २००२ साली उड्डाण पूल बांधण्यासाठी येथील सर्व दुकाने तोडण्यात आली. दरम्यान, सात वर्षांनी पुलाचे काम झाले व या व्यावसायिकांना पुलाखाली दुकाने देण्यात आली. आता १० वर्षांतच हा पूल पाडावा लागणार आहे. त्यामुळे पुलाखालील दुकानांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जेथे कार्यालय होते तेथे सध्या जवळपास १०० दुकाने तात्पुरती बांधण्यात आली आहे. या ठिकाणी जाण्यास अनेक दुकानदारांचा विरोध आहे. त्यांच्या मते स्टेशनवरून ग्राहक इतक्या लांब येणार नाहीत. दुसरे असे की, येथे काही दुकाने पुढील बाजूला तर काही आतील बाजूला आहेत. समोर असलेल्या दुकानांना ग्राहक मिळून जातील. पण, ज्यांना मागची दुकाने मिळतील त्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे दुकानदारांमध्येच भांडणे होण्याची भीती आहे.

यासंदर्भात गुरुवारी महापालिकेत बैठक होती मात्र वेळेवर ती रद्द झाली. आता पुढील बैठकीत तरी या दुकानदारांच्या व्यवस्थेचा सहानुभूतीने विचार कराव, अशी मागणी असोसिएशनचे सचिव रामदास धनाडे यांनी केली आहे. ज्या ठिकाणी आमची दुकाने सध्या आहेत त्याच ठिकणी पूल तोडल्यावर आमची तात्पुरती व्यवस्था करावी. हे शक्यच नसेल तर या पुलाच्या बाजूने असलेले रेल्वे स्थानकाचे सर्व मार्ग बंद करून एकच मार्ग ठेवावा व तो या तात्पुरत्या दुकानांसमोरून जाणारा असावा, अशा मागण्याही धनाडे यांनी केल्या आहेत.