नागपूर: प्रवासाला निघताना अस्वस्थ वाटतंय, किंवा घाईघाईत आरोग्याच्या काही तपासण्या राहून गेल्या अथवा अगदी सहज म्हणून आपल्याला आरोग्य तपासण्या करायच्या असतील तर ती सुविधा आता नागपूर रेल्वे स्थानकावरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सुरू करण्यात येणार आहे.
महसूलवाढ हे सध्या भारतीय रेल्वेने आपले लक्ष्य ठेवले आहे. आजवर प्रवासी आणि माल वाहतूक हे दोनच प्रमुख स्रोत महसूल वाढीचे होते. मात्र, अलीकडे प्रवासी भाड्याशिवाय महसूल कसा वाढवता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपूर विभागाने तर अशा उत्पन्नाचे आतापर्यंत तब्बल १५ स्रोत शोधून काढले असून त्यासाठी संबंधितांशी करारही केले आहेत. त्याच मालेत आता हेल्थ एटीएम ही नवीन सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली जाणार आहे. ही मशीन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर राहणार आहे. यात अगदी पाच मिनिटांत २१ प्रकारच्या तपासण्या करता येतील. उद्घाटनावेळी डीआरएम सोमेशकुमार व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. ही अभिनव सुविधा सुरू होण्यात सहायक वाणिज्य व्यवस्थापक व्ही. सी. थूल, ताराप्रसाद आचार्य यांची विशेष भूमिका आहे.