रेल्वेस्थानकावर लवकरच गेम झोन

नागपूर

नागपूर: प्रवासातील प्रतीक्षा कंटाळवाणी होऊ नये म्हणून येत्या दीड-दोन महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर छोट्यांसाठी गेमझोन तयार होणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.

नॉन फेअर रेव्हेन्यू योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, आजवरच्या सर्वच सुविधा प्रौढ प्रवासी डोळ्यापुढे ठेवून देण्यात आल्या होत्या. यावेळी पहिल्यांदाच छोट्यांचा विचार करण्यात आला आहे. बालकदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी ही खूशखबर आहे. रेल्वे प्रवासात अनेकदा गाड्यांच्या प्रतीक्षेत प्रवाशांना तासनतास प्लॅटफॉर्मवर काढावे लागतात. यात सर्वात जास्त कंटाळतात ती लहान मुले. ही मुले कंटाळली की पालकही त्रस्त होतात. कारण, या लहान मुलांचे मनोरंजन व्हावे, असे काही तेथे नसते. एरवी रेल्वे गाडी दिसली की, ‘ती बघ झुकझुक गाडी’ असे सांगून लहान मुलांचे लक्ष तिकडे वेधण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष रेल्वेस्थानकावर त्याला इतक्या झुकझुक गाड्या दिसतात की त्याचेही मुलांना अप्रूप वाटेनासे होते. मुलांना असे बोअर वाटू नये म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावर हा गेम झोन तयार करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यासाठी स्टेशन परिसरात जागेची पाहणी सुरू आहे. यासाठी तीन ते चार जागा पाहिल्या आहेत. त्यातून एक जागा निश्चित केली जाणार आहे. शक्यतो हा गेम झोन प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा लगतच्या परिसरात असावा, असा प्रयत्न असेल. या गेम झोनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स गेम, बालसंगीत आणि बरेच काही असेल. गेम झोनमध्ये मुलांना निश्चित आनंद मिळेल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आहे.

आजघडीस स्वतंत्र असा गेम झोन नसला तरी रेल्वेस्थानकावरील बुलंद आर्ट गॅलरी हे लहान मुले तसेच किशोरवयीनांचे आकर्षण आहे. तसेच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील वाघाची प्रतिकृतीही पाहण्यासाठी बालक हमखास थांबतात. नागपूर परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहीती छायाचित्रांसह या आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळते. स्थानक परिसरात असलेले वाफेचे इंजिनही मुलांचे लक्ष वेधून घेते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पुस्तकविक्रीची दुकाने आहेत. या ठिकाणी हिंदी, इंग्रजी कॉमिक्स, सामान्य ज्ञानाची पुस्तके उपलब्ध आहेत. साधारणत: उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्यांमध्ये लहान मुलांच्या पुस्तकांची विक्री वाढते, असे या विक्रेत्यांनी सांगितले.