नागपूर : शहरातील नागरिक करोनाने आपले जीव गमावत असतानाही राजकीय नेत्यांचा प्रसिद्धीचा सोस काही कमी होताना दिसत नाही. छाप्रू नगरात तर उद्घाटनासाठी चक्क लसीकरण थांबवण्यात आले. लस घ्यायला आलेल्यांना तब्बल चार ते पाच तास ताटकळत ठेवण्यात आले.
छाप्रू सवरेदय सभागृहात अनेक लोक सकाळी ७.३० वाजेपासून रांगा लावून उभे होते. परंतु, लस मिळत नव्हती. संस्थेतील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तर महापौर व उपमहापौरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्घाटनाची वेळ ११ ची देण्यात आली होती. त्यामुळे सकाळी ७.३० ला आलेले अनेकजण त्रासून गेले होते.
लोकांच्या तक्रारी महापौरांकडे गेल्यानंतर महापौरांनी छाप्रू सवरेदय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही उपमहापौर आणि भाजपचे आमदार केंद्रावर आल्यावरच लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. जवळपास पाच तास केंद्रावर नागरिकांना ताटकळत ठेवण्यात आले. मानेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींची गर्दी झाल्यामुळे आणि सकाळपासून अनेकजण रांगेत असल्याने अनेकांना भोवळ आली. या केंद्रावर सकाळी ८ वाजता आलेल्या व्यक्तीला दुपारी २ वाजता लस देण्यात आल्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे महापालिकेने तयार कलेल्या नियंत्रण कक्षात लसीकरणाबाबत माहिती विचारली जात असताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला लसीबाबत विचारले असता तेथील एका महिला कर्मचाऱ्याने लस नाही तर आता पाणी टाकून लस देणार का असे उत्तर दिले. शहरातील कुठल्या भागात लसीकरण केंद्र आहे याची माहिती विचारल्यावर वर्तमानपत्रात माहिती दिली आहे ती वाचा असे सांगितले जात आहे.