कोविड पॉझिटिव्ह आणि कोविड संशयित रुग्णांना एकाच बेडवर उपचार

कोविड पॉझिटिव्ह आणि कोविड संशयित रुग्णांना एकाच बेडवर उपचार

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह नागपूरही कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट ठरत आहे. या शहरांत दररोज हजारोच्या संख्येनं नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. परिणामी रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाकडून त्यांची हेळसांड होतं आहे. ऑक्सिजनसोबतचं खाटांची कमतरता प्रशासनाला सतावत आहे. रुग्णालयात बेडची कमतरता असल्यानं दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना त्याचबरोबर कोविड संशयित रुग्णांनाही एकाच बेडवर उपचार केले जात आहेत.

राज्याची उपराजधानी नागपूरची आरोग्य यंत्रणाही याला अपवाद नाहीये. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. नागपूरमध्ये दिवसाला तीन हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. याचा प्रचंड ताण नागपूर प्रशासनावर पडत आहे. ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं आहे. अशा रुग्णांना घरीच उपचार सुरू आहेत. मात्र ज्यांची प्रकृती अस्थिर आहे, अशाच रुग्णांना रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

असं असतानाही नागपूर आरोग्य यंत्रणेला रुग्णांचा ताण सोसत नाहीये. नागपूरातील शासकीय महाविद्यालयात बेडच्या कमतरतेमुळं कोविड पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांना एकाच बेडवर बसवून उपचार केले जात आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. नागपूरमध्ये बहुतांशी सरकारी रुग्णालयाची हीच स्थिती पाहाता नागरिकांमध्येही चितेंच वातावरण तयार होतं आहे.

देशातही कोरोना विषाणूची स्थिती भयानक बनत चालली आहे. नवीन रुग्ण सापडण्याच्या बाबतीत भारताने काल गेल्या वर्षातील सर्व विक्रम तोडले आहे. गेल्या चोवीस तासांत भारतामध्ये तब्बल 1,03,844 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. भारत आता अमेरिकेनंतर जगातला दुसरा देश ठरला आहे, ज्याठिकाणी एका दिवशी कोरोनाचे एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आता जागोजागी कडक निर्बंध लादले जात आहे.