नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित पारसे यांनी आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध न करता वाचलेल्या पैशातून कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटिंग युनिट भेट दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारसेंनी ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट’ हे यंत्र समर्पित केलं.
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. दररोज सात हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत असल्याने रुग्णालयात ना बेड मिळत आहेत, ना व्हेंटिलेटर. वेळेवर ॲाक्सिजन न मिळाल्याने अनेकांचे जीव जात आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्ते अजित पारसे यांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाचा खर्च वाचवला. त्यात काही पैसे जोडून कोरोना रुग्णांसाठी ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट’ हे यंत्र भेट दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारसे यांनी हे युनिट कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी समर्पित केलं आहे.
“व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना मृत्यू होताना दिसत आहे. त्यामुळेच वडील बाळासाहेब पारसे यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द केला. ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट’ कोरोना रुग्णांसाठी समर्पित केलं, हीच माझ्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली आहे” अशी भावना यावेळी अजित पारसे यांनी व्यक्त केली.
नितीन गडकरी यांचे आवाहन दरम्यान, विदर्भातील नगरपरिषद आणि तालुकास्तरावर ज्या सरकारी, गैर सरकारी ट्रस्टद्वारे संचालित रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटरची अत्यंत तातडीची आवश्यकता आहे, त्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा” असे आवाहन नितीनजी गडकरी यांनी केले आहे.
गडकरींच्या प्रयत्नाने मोबाईल लॅब नागपुरात नितीन गडकरींच्या प्रयत्नाने कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपुरात दाखल झाली आहे. लॅबमध्ये 425 रुपयांत रोज 2500 जणांची RTPCR चाचणी केली जाणार आहे. लवकरच मोबाईल लॅबचं नागपुरात इन्स्टॉलेशन होणार आहे. कोरोना चाचणीचा वाढवलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे.