नागपूर: सध्या करोना रुग्णांना खाटा मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक प्रचंड मानसिक तणावात आहेत. याच बाबीचा फायदा उचलून खाट मिळवून देण्याच्या नावाखाली एका करोना बाधिताच्या नातेवाईकाची २० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ‘मी सेव्हन स्टार हॉस्पिटलमधून बोलतोय,’ असे सांगून करोना बाधित रुग्णाला भरती करवून घेण्याच्या नावाखाली २० हजार रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी हे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. यांची पत्नी करोना बाधित आहे. या महिलेचा एचआरसीटी स्कोअर २४ असून त्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर सध्या एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. फिर्यादीला त्यांच्या पत्नीला दुसऱ्या इस्पितळात हलवायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवरून सेव्हन स्टार हॉस्पिटलचा फोन क्रमांक मिळविला.
पत्नीसाठी खाट मिळविण्याच्या उद्देशान त्यांनी त्यावर फोन केला. मात्र हा फोन उचण्यात आला नाही. काही वेळाने त्यांना ८६९८४४०००६ या क्रमांकावरून फोन आला. या इमसाने स्वत:चे नाव राहुल कुमार असे सांगितले. ‘तुमच्या रुग्णासाठी सेव्हन स्टारमध्ये खाट उपलब्ध आहे. त्यासाठी २० हजार रुपयांची अगाऊ रक्कम भरा.’ त्याने फिर्यादीला बँकेच्या खात्याची माहिती पाठविली. फिर्यादीने त्याच्या खात्यावर रक्कमही पाठविली. मात्र सदर नावाचा व्यक्ती सेव्हन स्टारमध्ये कामालाच नसल्याचे समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले.
नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या क्रमांकावर फोन केला होता. त्यामुळे या हॉस्पिटलच्याच सिस्टिममधून आरोपीनी तक्रारदाराचा दुरध्वनी क्रमांक मिळविला असा दाट पोलिसांना असून पोलिस या दृष्टीकोनातून तपास करीत आहेत.



