फोन करून दिली चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी ; ‘हे’ होते कारण

फोन करून दिली चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी ; 'हे' होते कारण

नागपूर: आपली शेतजमीन प्रकल्पात गेली. त्याचा भरीव मोबदला आणि नोकरी मिळेल, अशी त्याला आशा होती. त्यासाठी २४ वर्षांपासून तो लढत आहे. सरकारी यंत्रणेशी लढताना त्याचा अस्थिभंग झाला अन् तो दिव्यांगही झाला. मात्र त्याला पाहिजे तो मोबदला मिळाला नाही आणि नोकरीही मिळाली नाही. बधीर प्रशासनाच्या कानांवर आपली हाक जात नसल्याचे पाहून त्याने मुंबईत फोन करून चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडाली. तिकडे मुंबईत गुन्हा दाखल झाला; तर इकडे उमरेड पोलीस ठाण्यात सागर काशीनाथ मांढरे या शेतकऱ्याची पोलिसांनी चौकशी चालविली आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेडपासून १० किलोमीटर अंतरावर मकरधोकडा गाव आहे. सागर काशीनाथ मांढरे यांची मकरधोकडा शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन होती. या जमिनीचा सौदा काशीनाथ मांढरे यांनी तीन वेगवेगळ्या लोकांसोबत केला. दरम्यान, येथे कोळसा खंदाणीसाठी शेतजमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्यांच्या नावावर शेतीचे विक्रीपत्र होते, त्यांना सरकारने मोबदला दिला आणि प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीही दिली. या प्रकल्पात आपल्या मालकीची २७ गुंठे शेतजमीन गेल्यामुळे आपल्यालाही मोबदला मिळावा आणि प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळावी, अशी १२ वीपर्यंत शिकलेल्या सागरची अपेक्षा होती. मात्र त्याला ना नोकरी मिळाली, ना मोबदला. त्यामुळे ‘सागरचा जीव तळमळला.’ त्याने आपला कायदेशीर लढा सुरू केला.

२७ गुंठे शेतजमीन घेणाऱ्या शासन आणि वेकोलीने आपल्याला (आता आपल्या मुलाला) नोकरी द्यावी म्हणून त्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडे दाद मागितली. जमीन मोजणीसाठी अर्जसुद्धा केला. त्यानंतर वेकोली तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालयापर्यंत अर्ज, तक्रारी केल्या. त्या दुर्लक्षित झाल्याची भावना झाल्यानंतर आत्महत्या करण्याचाही इशारा दिला. (यावरून पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर कारवाईसुद्धा केली.) मात्र त्याला दाद मिळाली नाही. न्याय्य मागणीसाठी सरकारी अधिकारी कार्यालयाचे उंबरठे आणि स्वतःचे तारुण्य झिजविणाऱ्या सागरला काहीही हाती लागले नाही. हो, त्याला सततची पायपीट आणि तणावामुळे अस्थिभंग होऊन दिव्यांगत्व आले. त्यामुळे तो प्रचंड वैफल्यग्रस्त झाला. याच वैफल्यग्रस्ततेतून त्याने रविवारी फोन करून थेट मंत्रालयच उडवून देण्याची धमकी दिली. त्याच्या या धमकीने राज्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. खडबडून जागे झालेल्या सुरक्षा यंत्रणेने सागरविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल केला; तर इकडे उमरेडमध्ये त्याची चौकशी सुरू आहे.

अशी होती शेतजमीन                                                                                                        काशीनाथ उपासराव मांढरे यांच्या नावाने एकत्रीकरण योजनेमध्ये गट नंबर ३२६/१, आराजी १.६२ हे. आर. आणि गट नंबर ३२७/३, आराजी १.२१ हे. आर. दर्ज होती. पुनर्मोजणी योजनेत दोन्ही गट नंबर मिळून नवीन भुमापन क्र. ५९६, आराजी २.६३ हे. आर. कायम करण्यात आली. यानंतर त्यांची शेती जितेंद्र गुंगाराम झाडे (०.८१ हे. आर.), राहुल परसराम येवले (०.९७ हे. आर.) आणि भारती हरिश्चंद्र झाडे यांना ०.८५ हे. आर. विक्री केली. आता या संपूर्ण जागेवर धुरे मोक्यावर अस्तित्वात नाही. केवळ मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसून येत असल्याने मोजणी करणे अशक्य असल्याचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाने दिल्याचे समजते.