नागपूर : पाण्याची टंचाई लक्षात घेता ज्यांच्याकडे वैध नळ कनेक्शन आहेत, त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. अवैध नळ कनेक्शन अर्थात पाण्याची चोरी आहे. त्यामुळे अवैध नळ कनेक्शन विरोधातील मोहीम तीव्र करा. टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाई करा आणि आवश्यक त्या झोनमध्ये टँकर वाढविण्यात यावे, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.
नागपूर शहरातील झोननिहाय पाण्याचा आढावा घेण्यासाठी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नगरसेवक भगवान मेंढे, मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय, एच.आर. व्यवस्थापक के.एम.पी. सिंग, श्री. कालरा, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, गणेश राठोड, राजू भिवगडे, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, अशोक पाटील, हरिश राऊत यांच्यासह मनपाच्या जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेटस् उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी झोननिहाय पाणी परिस्थितीची आढावा घेतला. झोननिहाय समस्या आणि अडचणी ऐकून घेतल्या. धरमपेठ आणि धंतोली झोनमध्ये दोन-दोन वाढीव टँकरची मागणी लक्षात घेता ते वाढवून देण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर वाडी नगर परिषदेच्या पाईप लाईनला जोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे दररोज नागपूरचे ३,५०,००० लीटर पाणी वाडी नगर परिषदेला मिळते. हे कनेक्शन कापण्यासाठी गेले असता लोकांचा जमाव येतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तातडीने पोलिस संरक्षण घेऊन कनेक्शन तोडण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
पाण्याची कमतरता लक्षात घेता पाणी कपातीच्या दृष्टीने सर्व झोनच्या डेलिगेटस्ने तसे नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिले. सतरंजीपुरा झोनमधये अनेक ठिकाणी टिल्लू पंप वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगत ते जप्त करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. सर्व झोनच्या सहायक आयुक्तांनी एक पथक तयार करून टिल्लू पंपवरील कारवाईचा वेग वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी सहायक आयुक्त आणि डेलिगेटस्ची जबाबदारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी निश्चित केली.
यावेळी जलप्रदाय विभागाने तातडीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा गोषवारा दिला. बैठकीला जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : मेट्रो रिजनपर्यंत वाढवा अकरावीचे प्रवेश