नागपूर : शहरात सुरु असलेल्या महामेट्रो नागपूर प्रकल्पात वापरण्यात येणारे उपकरण नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. महा मेट्रोने आता ट्रॅकच्या मेंटेनंससाठी एक नवीन मशीन(यंत्र) आयात केली आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत महत्वाच्या आणि आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञाच्या साहाय्याने भारतातच या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. विविध वैशिष्ठ्याने परिपूर्ण ही अत्याधुनिक मशीन दिल्ली जवळील फरिदाबाद येथे प्लासर इंडियाने तयार केली आहे.
मेंटेनन्स संबंधित कार्य करण्यास उच्च कार्यक्षमता असणारी ही नवीन ०८-१६ बी एसएच/झेडडब्ल्यू (08 /16 B SH/ZW) मशीन पूर्णपणे सक्षम आहे. यात ट्रॅकचे दुरुस्तीकरण, मोजमाप करणे, कामांची गुणवत्ता सुनिश्चित करणे, रुळांमधले अंतर आणि मार्गात येणारे अडथळे यावर लक्ष ठेवणे अश्या विविध कार्यांचा समावेश आहे. मशीनचे डिझाइन आणि फ्रेम सर्वोत्कृष्ठ तंत्रज्ञानच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. सरळ असणारे आणि पलटणाऱ्या (टर्नआउट्स) अश्या दोन्ही ट्रकवर ही मशीन कार्य करते. यामुळे वेगळ्या टर्नआउट मशीनची आवश्यकता भासत नाही. मशीन ऑपरेटिंगचा खर्च कमी आहे. स्मार्ट-एएलसी, सीएमएस आणि सीडब्लूएस प्रणालीच्या नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या मशीनद्वारे मॅन्युअल मापन देखील केले जाऊ शकते. यामुळे निश्चितच नागपूर मेट्रोवरील ट्रॅकची देखभाल करण्यासाठी सुरक्षा, विश्वसनीयतेत भर पडेल.
नवीन ०८-१६ बी एसएच/झेडडब्ल्यू मशीनमध्ये एक स्वयं-चालित युनिट असून यात नवीनतम डेटा रेकॉर्डिंग, मूल्यांकन आणि प्रदर्शन प्रणाली (डीआरपी) सह मशीनची नियंत्रण प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे. व्हिज्युअल कंट्रोलसाठी कॅमेरा आणि मॉनिटरिंग स्क्रीन मशीनमध्ये लावण्यात आले आहेत. या मशीनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अतिरिक्त मशीनची व क्रेनची देखील गरज भासणार नाही.
अधिक वाचा : विदर्भात तयार होणार मेट्रो कोचनिर्मिती कारखाना