लुटारूंनी मारला कारला दगड, कार थांबविली आणि हे घडले….

लुटारूंनी मारला कारला दगड, कार थांबविली आणि हे घडले....

नागपूर : एका सुपारी व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला करून दोन लुटारूंनी कारमध्ये ठेवलेले ४ लाख ६० हजार रुपये लुटून नेले. ही घटना जबलपूर-हैदराबाद मार्गावरील पांजरी गावाजवळ घडली. या लूटमार प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सादगाव बाजार चौक, बुटीबोरी येथे राहणारे राजेश किसानसिंग चंदेल (३९) यांचा सुपारीचा व्यवसाय आहे. सुपारी खरेदी करून त्याची कटाई केल्यानंतर लहानमोठ्या पानठेल्यावर ते सुपारीची विक्री करतात. काल सोमवारी चंदेल यांनी विकलेल्या मालाची वसुली करून ४ लाख ६० हजार रुपये गोळा केले. हे पैसे सुपारी व्यापाऱ्यांना देण्यासाठी ते कारने मस्कासाथ येथे येत होते.

जबलपूर-हैदराबाद मार्गावरील पांजरी गावाजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन लुटारूंनी चंदेल यांच्या कारला दगड मारला. त्यामुळे त्यांनी कार थांबविली. तोच दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने चंदेल यांच्यावर चाकूने वार केला. भितीपोटी चंदेल हे कार सोडून समोर असलेल्या टोल नाक्याकडे मदत मागण्यासाठी गेले. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना घेऊन ते कारजवळ आले.

या दरम्यान ती संधी साधून चोरांनी कारमध्ये ठेवलेले रोख ४ लाख ६० हजार रुपये लुटून नेले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.

जवळच्या व्यक्तीने दिली टीप
सुपारी व्यापारी राजेश चंदेल यांची कुणीतरी जवळच्या व्यक्तीने टीप दिली असावी. दुचाकीने कारचा पाठलाग केल्यानंतर कारमध्ये एकट्याला बघून आरोपींनी कट रचून लूटमार केली असावी. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.