नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या एमबीबीएस द्वितीय वर्षांची विद्यार्थिनी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या पुतणीने बुधवारी रात्री मेडिकलच्या वसतिगृहात पॅरासिटामॉलच्या २२ गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीची प्रकृती अत्यवस्थ असून तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करत आहेत.
ही १९ वर्षीय विद्यार्थिनी अकोला येथील रहिवासी आहे. मेडिकलच्या द्वितीय वर्षांत शिकत असून वसतिगृह क्रमांक दोनमध्ये राहते. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाचा ताण वाढल्यामुळे ती गेल्या वर्षभऱ्यापासून नैराश्यात होती. तिच्यावर उपचार सुरू असले तरी तिने मध्यंतरी परस्पर उपचार बंद केले होते. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा तणावात दिसत होती. यातच तिने बुधवारी रात्री २२ गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ती अस्वस्थ झाली.
ही माहिती तातडीने वसतिगृहाच्या वार्डनसह मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तिला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. काही वेळात मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह इतर विभागाच्या प्रमुखांनी अतिदक्षता विभागात धाव घेतली. तिच्या पोटातील पाणी काढण्यासह इतरही उपचार करण्यात आले.
दोन वर्षांत पाच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
मेडिकलध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोन जण दगावले. मार्च २०१७ मध्ये एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मे २०१७ मध्ये अशवंत खोब्रागडे याने मेडिकलमधील लायब्ररीच्या पाठीमागील बाजूस कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. तत्पूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये रोशन शिरसाट या विद्यार्थ्यांने वसतिगृह क्रमांक पाचमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून एका महिला निवासी डॉक्टरनेही गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
अधिक वाचा : नोकरीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांनी फसवणूक