नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या कलादालन संघांनी जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेमध्ये चार पुरस्कार पटकाविण्याची उल्लेखनिय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयोजनाने जिल्हास्तरीय व्यावसायीक संस्था रवीनगर येथे जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा सदर संघाने प्रथम स्थान पटकाविले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा उंटखाना संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. लोकृत्य स्पर्धेमध्ये मनपाच्या वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा संघाने पहिले स्थान प्राप्त केले तर सुरेंद्रगड उच्च प्राथमिक शाळेने दुसरा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे, भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा सदर व वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी कलादालन सदर येथे तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. यामधील विजयी संघ जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा सदर संघाने ‘किशोरावस्थेतील मुलांची स्वछंद मैत्री’ या विषयावर नाटक सादर केले. प्रथम क्रमांकावर बाजी मारणाऱ्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मनपा शाळेतील शिक्षिका मधु पराड व दिग्दर्शन श्रीकांत मंगरुळकर यांनी केले. तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा उंटखाना संघाने व्यसनमुक्तीवर पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्याचे दिग्दर्शन श्रीमती काटेकर व अनिता भोतमांगे यांनी केले.
लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकप्राप्त वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेने पर्यावरण संवर्धन विषयावर सादरीकरण केले. या नृत्याचे दिग्दर्शन प्रेषिता पहाडे व मुख्याध्यापिका रजनी परिहार यांनी केले. स्पर्धेत दुसरे स्थान गाठणाऱ्या सुरेंद्रगड उच्च प्राथमिक शाळेने भ्रूण हत्या विषयावर सादरीकरण केले. या नृत्यासाठी प्रिती उके व गिता विष्णू यांनी संघाला मार्गदर्शन केले.
मनपाच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कार्यक्रम समन्वयक संध्या पवार व श्रीमती दिवाटे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी संघांसह विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले दोन्ही संघ, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा : कामठीमधील ड्रॅगन पॅलेस येथे ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’- सुलेखा कुंभारे