नागपूर-इंदूर विमानसेवा २५ पासून सुरू होणार

विमानसेवा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे.

२५ आॅगस्टला इंदूरहून पहिले उड्डाण ६ई ७२८९ सकाळी ११.३५ वाजता रवाना होईल आणि दुपारी १२.४० वाजता नागपुरात पोहोचेल. हे विमान नागपुरातून ६ई ८२९८ दुपारी १.०५ वाजता टेक आॅफ करून दुपारी २.१० वाजता इंदूर येथे उतरेल. हे उड्डाण दरदिवशी राहणार आहे. उल्लेखनीय असे की, लॉकडाऊनपूर्वी नागपूर-इंदूरकरिता विमानसेवा उपलब्ध होती. ही सेवा १८० सिटच्या विमानाने होती. हे विमान बंगळुरुहून नागपुरात येऊन इंदूरकडे रवाना व्हायचे आणि इंदूरहून मुंबई-दिल्ली आणि दिल्लीहून रांचीकडे जायचे. त्यावेळी नागपुरातून इंदूरकरिता कमी प्रवासी संख्या असतानाही या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. या विमानात बंगळुरूहून इंदूरकरिता प्रवासी राहायचे आणि नागपूरला पोहोचल्यानंतर येथून प्रवाशांना घेऊन विमान निघायचे. इंदूरकरिता कमी प्रवासी संख्या असल्याने सध्या कंपनी ७२ सिटचे एटीआर विमान चालवित आहे.

नागपुरातून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे उड्डाणे उपलब्ध आहेत, पण पूर्वेकडे आणि महत्त्वपूर्ण शहराच्या स्वरुपात कोलकाताकडे जाणारे विमान सध्या सुरू झालेले नाही. पश्चिम बंगाल शासनाकडून हिरवी झेंडी मिळाग्ल्यानंतरच या मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे.