नागपूर : पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने घेतला गळफास !

suicide Nagpur
Dead woman lying on the floor under white cloth with focus on hand

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : “मला तुझ्याशिवाय करमत नाही, मी आत्महत्या करतोय”, असे म्हणत पत्नीला व्हिडीओ कॉल करून तरुणाने आत्महत्या केली. ही धक्‍कादायक घटना नागपूर जिल्‍ह्यातील सीताबर्डी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली.

यश शिवहरे (वय २४) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश शिवहरे त्याचे कापडाचे दुकान आहे. त्‍याचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्याला अडीच वर्षांचा मुलगा आहे. ५ मार्च रोजी यश व पत्नीत वाद झाला. त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली. दरम्‍यान, यश हा तणावात होता. शुक्रवारी तो पत्नीला भेटायला तिच्‍या माहेरी गेला होता. रात्री मित्राने त्‍याला घरी सोडले. ‘त्याच्याकडे लक्ष ठेवा’, असे मित्राने त्‍याच्या आईला सांगितले.

दरम्‍यान,रात्री त्याने आईजवळील मोबाइल घेतला. १ वाजण्‍याच्‍या सुमारास त्‍याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला. ‘मी आत्महत्या करीत आहे’, असे सांगत त्‍याने फोन बंद केला. तात्‍काळ सासूने त्याच्या काकाला या घटनेची माहिती दिली. काका घरी पोहोचेपर्यंत यशने गळफास लावून घेतला होता. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय नेमाडे करीत आहेत.