नागपूर : आज गुरुपौर्णिमा आणि ग्रहणही

नागपूर : मंगळवारच्या गुरुपौर्णिमेलाच यंदा खंडग्रास चंद्रग्रहण होणार असले तरी त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या पूजेत कुठलीही अडचण नसल्याचे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री १.३१ वाजता ग्रहण स्पर्श होईल व पहाटे ४.२९ वाजता ग्रहण संपेल. मात्र, ग्रहणाचे वेध दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी लागणार आहेत. वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला यांनी रात्री ९ वाजेपासून ग्रहणाचे वेध पाळावे, असे महाराष्ट्रीय पंचागकर्त्या विद्याताई राजंदेकर यांनी म्हटले आहे. वेध लागल्यावर पूजा, जप करायला बंधन नाही. मात्र, त्या काळात खाणे टाळावे.

महाराष्ट्रीय पंचागात दिलेल्या माहितीनुसार, हे ग्रहण उत्तराषाढा नक्षत्रावर धनू व मकर राशीतून होत आहे. वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, या राशींना हे ग्रहण पीडक आहे. तसेच पूर्वाषाढा, उत्तराषाढा व श्रवण जन्मनक्षत्रे असलेल्या व्यक्तींना हे ग्रहण त्रासदायक आहे. हे ग्रहण आषाढ महिन्यात होत असल्याने पर्जन्यवृष्टी कमी होईल तसेच नदीकाठी राहणारे व पाण्यावर उपजीविका करणारे, चीन, काश्मीर व मध्यप्रदेशातील जनेतला ग्रहण त्रासदायक असल्याचे सांगण्यात आले.

जन्मराशीपरत्वे ग्रहणाचे फल असे- मेष- सौख्यप्रद, वृषभ- मानभंग, मिथुन- अरिष्टप्रद, कर्क- जोडीदारास त्रास, सिंह- सौख्यदायक, कन्या- चिंतावृद्धी, तूळ- मनस्ताप, वृश्चिक- लक्ष्मीप्राप्ती, धनू – द्रव्यनाश, मकर- शारीरिक पीडा, कुंभ- आजार, मीन- द्रव्यलाभ.

अधिक वाचा : नागपुरात तीन दिवस पाणी बंद ; बुधवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवशी शहरात पाणीच येणार नाही