नागपूर : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या मित्राच्या भेटीसाठी उपराजधानीतील दहाव्या वर्गाच्या विद्यार्थिनीने घरून पळ काढला व राजस्थान गाठले. लोहमार्ग पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने मुलीचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
अत्यंत हुशार असलेली ही विद्यार्थिनी वडिलांचा फोन हाताळायची. इन्स्टाग्रामवरून तिची राजस्थानच्या युवकासोबत ओळख झाली. त्याला भेटायचेच या निर्धाराने तिने २१ जानेवारीला घर सोडले. तिने मैत्रिणीला सोबत घेतले होते. दोघींही अजनी स्थानकावरून विनातिकीटच पुण्याला व तिथून अहमदाबादला गेल्या. त्यानंतर मैत्रीण नागपूरला परतली. इकडे मुलगी बेपत्ता असल्याने वडिलांनी सील्याताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी रियाकडे असले मोबाईलचे लोकेशन घेणे सुरू केले. त्याच मोबाईलमुळे मित्राचा क्रमांक पोलिसांना मिळाला. मित्राशी संपर्क साधताच विद्यार्थिनी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली. लोहमार्ग पोलिस सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. मुलगी येताच माहिती देण्याची ताकीद पोलिसांनी त्याला दिली.
बेपत्ता असलेली विद्यार्थिनी एकटीच कोट्याला आणि तिथून भिलवाडा येथे पोहोचली. मित्राने लगेच लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख यांनी याबाबत स्थानिक लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून मुलीबाबत माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. थोड्याच वेळात तिचे वडीलही तिथे पोहोचले. कागदोपत्री कारवाईनंतर मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले.
अधिक वाचा : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीस अटक